सुनील मेंढे : मका खरेदी केंद्र सुरू करण्याचे दिले निर्देश भंडारा : खरीप हंगाम पूर्व बैठक भंडारा पालकमंत्री डॉ. विश्वजित कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालय भंडारा येथे शनिवारी पार पडली. सद्यपरिस्थितीत शेतकरी कोरोनामुळे हवालदिल झालेला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना येत्या हंगामात खते व बी बियाणे यांचा तुटवडा होऊ नये यासाठी योग्य नियोजन करण्याचे निर्देश खा. सुनील मेंढे यांनी दिले. मागील वर्षी अनेक शेतकऱ्यांना निधीअभावी वीज जोडण्या देण्यात आल्या नव्हत्या. यावर्षी राज्य शासनाने निधीअभावी वीज जोडणी थकीत राहू नये यासाठी काळजी घेण्याचे, तसेच सोलर जोडण्यासाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्याचा सूचना खा. मेंढे यांनी केल्या. लघुपाटबंधारे प्रकल्प नादुरुस्त असल्याने शेतकऱ्यांना मुबलक प्रमाणात सिंचनाची सोय होत नाही. राज्य शासनाने मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करून सिंचन प्रकल्प तातडीने दुरुस्त करावे ज्यामुळे जास्तीत जास्त शेतकऱ्यांना सिंचनाची सोय उपलब्ध होईल. कास्तकारांच्या गंभीर समस्यांवर लक्ष वेधताना खासदार सुनील मेंढे यांनी शेतकरी बांधवांचे धानाचे उर्वरित चुकारे ताबडतोब देण्यात यावे, येत्या खरीप हंगामात कास्तकारांना युरिया पुरेशा प्रमाणात उपलब्ध व्हावा, युरियाचा काळाबाजार होऊ नये यासाठी शासनाने डोळ्यात तेल टाकून तयार राहावे, निधीअभावी कास्तकारांना वीज जोडण्यांपासून वंचित राहावे लागू नये, धडक सिंचन विहीर योजनेचे अडकलेले २.९१ कोटी निधीचा त्वरित चुकारा करावा अशा जोरकस मागण्या केल्या.
तुमसर रेल्वे येथील रॅक पॉइंटचा विषय प्रलंबित आहे. कृषी विभाग व पुरवठा विभाग यांनी खते, बी बियाण्याठी रेल्वे विभागाकडे प्रस्ताव पाठविल्यास रेल्वे मंत्रालयात पाठपुरावा करण्याची तयारी असल्याचेही खा. मेंढे यावेळी म्हणाले.
या बैठकीला आमदार अभिजित वंजारी, आमदार राजू कारेमोरे, जिल्हाधिकारी संदीप कदम, अप्पर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती, निवासी उपजिल्हाधिकारी शिवराज पडोळे, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी हिंदुराव चव्हाण, उपनिबंधक मनोज देशकर, कार्यकारी अभियंता राजेश नाईक, पणन अधिकारी गणेश खर्चे व विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.