मुखरू बागडे
पालांदूर : पोलीस उपनिरीक्षक पदाची परीक्षा पास होऊन १३ महिन्यांचा कालावधी लोटूनसुद्धा ४१५ पोलीस उपनिरीक्षकांना प्रशिक्षणाकरिता अजूनही आमंत्रित केलेले नाही. प्रशासकीय अडचणीचे कारण पुढे करीत वेळ मारून नेली जात आहे. आधीच बेरोजगारीने खितपत पडलेल्या तरुणाईला १३ महिन्यांचा कालावधी संकटात खेचणारा आहे. प्रशिक्षणासाठी ‘तारीख पे तारीख’ मिळत असून प्रशिक्षणार्थी प्रतीक्षेत आहेत.
बेरोजगारीचे प्रमाण खूप मोठे आहे. स्पर्धेच्या युगात परीक्षा पास होणे खूप कठीण आहे. प्रयत्नांची पराकाष्ठा करीत ग्रामीण भागातील युवकांनी पोलीस उपनिरीक्षकाची परीक्षा पास केली. पूर्व परीक्षा व मुख्य परीक्षा २०१८ मध्येच पार पडली असून त्यांचा निकाल १७ मार्च २०२० रोजी जाहीर झाला. यात उमेदवारांचे साडेतीन वर्षे खर्च झाली. निकाल लागल्यानंतर प्रशिक्षणाकरिता केवळ तीन महिन्यात आमंत्रित करणे अपेक्षित होते. कोरोनाची उद्भवलेले संकट स्थिती व महाराष्ट्र पोलीस अकादमी मध्ये सुरू असलेल्या उमेदवारांचे प्रशिक्षण यामुळे आमच्या प्रशिक्षणाला अक्षम्य विलंब होत असल्याची टीका भावी पोलीस उपनिरीक्षक यांनी लोकमतकडे व्यक्त केली आहे.
२६ एप्रिल २०२१ ला प्रशिक्षण होण्याचे पत्र पाठवले. मात्र पुन्हा शासनाने १६ एप्रिलला एक परिपत्रक काढून प्रशिक्षण २३ जून २०२१ होणार असल्याचे कळविले आहे. वारंवार तारखा बदलल्याने तारखांवर आता विश्वास उडत आहे.
कोरोनाच्या संकटकाळात शासनाला कोरोना योद्ध्यांची गरज असताना आमच्यासारख्या नवजवान तरुणांना काम करण्याची मनोमन इच्छा असतानासुद्धा वाव मिळत नाही. तर दुसरीकडे मुंबईसारख्या शहरात कोणतीही पूर्व परीक्षा न घेता तरुणांना पोलीस भरतीसाठी आमंत्रित करण्याचे ऐकिवात आहे. यावरून शासनाच्या दुटप्पी धोरणाचा अनुभव विद्यार्थी वर्गांना येत आहे. मुके व बहिरे शासन-प्रशासन भावी पोलीस उपनिरीक्षकांना योग्य वेळी कोरोनाच्या संकटात देशसेवा करण्याची संधी देतील का, हा प्रश्न लोकमतच्या माध्यमातून शासनाला विचारलेला आहे.
कोट बॉक्स
तृप्ती पांडुरंग खंडाईत (पालांदूर), भोजराम श्यामराव लांजेवार (मऱ्हेगाव पोस्ट पालांदूर), दीप्ती जयकांत मरकाम (मुरमाडी /लाखनी), अपूर्वा ताराचंद बोरकर (साकोली) असे चार पोलीस उपनिरीक्षक भंडारा जिल्ह्यातून पास झाले. मात्र १३ महिन्यानंतरही त्यांना सेवेत संधी मिळालेली नाही.
केंद्र शासनाच्या सर्व प्रशिक्षण संस्था सुरू आहेत. त्याअंतर्गत आम्हाला प्रशिक्षणार्थी म्हणून पाठवावे. आम्हाला मिळालेला बॅच नंबर तोच राहील की बदलेल याची चिंता सतावत आहे. आमचे प्रशिक्षण वेळेवर करून आम्हाला न्याय द्यावा. कठीण मेहनतीनंतर परीक्षा पास होऊनही देशसेवा करण्याची संधी मिळत नाही. चुकीच्या धोरणाचा फटका बसत आहे. लवकरात लवकर सेवेत दाखल करावे, हीच आमची विनंती आहे.
भोजराम लांजेवार, मऱ्हेगाव