चुल्हाड (सिहोरा) : आगामी येणाऱ्या सणासुदीच्या दिवसाचे औचित्य साधून पोलीस स्टेशन सिहोरा येथे शांतता समितीची बैठक ठाणेदार नारायण तुरकुंडे यांच्या अध्यक्षतेखाली तर परिसरातील पोलीस पाटील आणि प्रतिष्ठित नागरिक यांच्या प्रमुख उपस्थितीत ४ सप्टेंबरला घेण्यात आली.
आगामी कालावधीत येणाऱ्या सार्वजनिक गणेशोत्सव, पोळा, नवरात्र उत्सव आधी सणांच्या पार्श्वभूमीवर शांतता व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी तसेच कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या संदर्भात मार्गदर्शन सूचना देण्यासाठी शांतता समितीची बैठक बोलावण्यात आली होती. यावेळी उपस्थितांनी गावाची संपूर्ण माहिती, समाजनिहाय संख्या, भौगोलिक परिस्थिती लक्षात आणून दिली. सिहोरा पोलीस स्टेशनचे सहायक निरीक्षक नारायण तुरकुंडे यांनी सार्वजनिक सण उत्सव साजरे करण्यासंदर्भात मार्गदर्शक सूचना दिल्या. गावात कुठल्याही प्रकारचे अनुचित प्रकार, वादविवाद होऊ नये यासाठी सर्वांनी एकजुटीने राहून प्रयत्न करावेत. कोरोनापासून गावकऱ्यांनी स्वतःचा बचाव करावा, असे आवाहन केले. गावात कोणी विघ्नसंतोषी कृत्य करणारे असेल तर त्यांच्या बाबत पोलीस ठाण्यात माहिती द्यावी. त्यांच्यावर कायद्याचा बडगा उगारून बंदोबस्त करू, असेही त्यांनी आवर्जून सांगितले. ‘एक गाव एक गणपती’ साजरा करावा.
यावेळी रियाज अली सय्यद, सुखदेव टेंभरे, पोलीस पाटील मेश्राम, अनिल पारधी, निशा शामकुंवर, माधुरी ढबाले, आशा गायकवाड, रामेश्वर शरणागत, राजेंद्र भोयर, हरिराम खोब्रागडे, चंद्रभोज रहांगडाले, परिसरातील पोलीस पाटील, तंमुसचे अध्यक्ष, शांतता समितीचे सदस्य व गावातील प्रतिष्ठित नागरिक तसेच सर्व बीट अंमलदार आदी उपस्थित होते. प्रास्ताविक व सूत्रसंचालन धनंजय मांडोळे यांनी केले. तसेच आभार पाटखडकी गावच्या पोलीस पाटील मनीषा मराठे यांनी मानले. आदेशाचे पालन करा
४ सप्टेंबर २०२१ रोजी पोलीस स्टेशन सिहोरा कार्यक्षेत्रातील शांतता समिती, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे पदाधिकारी, पोलीस पाटील, प्रतिष्ठित नागरिक यांची आगामी येणाऱ्या पोळा, तान्हा पोळा, गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर बैठक घेण्यात आली. या बैठकीमध्ये जिल्हाधिकारी सा. भंडारा व महाराष्ट्र शासनाने सांगितलेल्या कोविड-१९ नियमांचे पालन करूनच सदर सण साजरा करण्यास सांगितले.