भंडारा : आयुर्वेदिक वस्तूंचे निर्माता असलेल्या साकोली येथील किसान उद्योगाच्या संचालकाने दाखल केलेल्या तक्रारीवरून ग्राहक मंचने आदेश दिला आहे. यात मंचने भंडारा आगार व्यवस्थापकावर दंडात्मक कारवाईचा आदेश दिला आहे. याची अंमलबजावणी ३० दिवसाच्या आत करण्याचेही आदेशात म्हटले आहे.साकोली येथील प्रवीण पटेल यांचा किसान उद्योग आहे. राज्य परिवहन महामंडळाच्या बसने ते साहित्य पाठवितात. पटेल यांनी जालना येथील राजेश वाघ यांना बसने १० फेब्रुवारी २०१२ ला पार्सल पाठविले होते. मात्र ते पार्सल त्यांना मुदतीत नियोजित ठिकाणी पोहचले नाही. त्यामुळे वाघ व पटेल यांना मानसिक त्रास सहन करावा लागला.याप्रकरणी पटेल यांनी भंडारा ग्राहक मंचकडे आगार व्यवस्थापक यांच्याविरूध्द प्रकरण दाखल केले. यात त्यांनी पार्सल किंमत, वाहतुक भाडे, प्रवास खर्च, त्रासापोटी खर्च देण्याची मागणी केली. याबाबत मंचने आगार व्यवस्थापकांचे म्हणणे ऐकले. यात पटेल यांनी दिलेल्या पत्त्यानुसार जालना आगारात पार्सल घेण्यासाठी कुणी उपस्थित नव्हते. अपुऱ्या पत्त्यामुळे संपर्क झाला नाही, असे सांगितले. आगार व्यवस्थापकांचे म्हणणे समाधानकारक वाटले नाही. त्यामुळे मंचचे अध्यक्ष अतुल आळशी, सदस्या गीता बडवाईक, हेमंतकुमार पटेरिया यांनी पटेल यांना पार्सलचे ४,५०० रूपये, वाहतूक भाडे १२१ रूपये, शारीरिक व मानसिक त्रासापोटी ३,००० रूपये, तक्रारीचा खर्च २,००० रूपये देण्याचे आदेश दिले आहे. (शहर प्रतिनिधी)
ग्राहक मंचचा भंडारा आगार व्यवस्थापकाला दंड
By admin | Published: December 27, 2014 10:45 PM