ज्ञानेश्वर मुंदे।लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : आगामी लोकसभा निवडणुकीत भंडारा-गोंदिया मतदार संघात कोणता पक्ष कुणाला उमेदवारी देतो याची प्रचंड उत्सुकता नागरिकांत आहे. प्रत्येक पक्षात अनेकजण इच्छुक असून उमेदवारीवरून राष्ट्रवादी काँग्रेस बिनधास्त दिसत आहे, तर भाजपात उमेदवाराची शोधाशोध सुरू आहे.देशाच्या राजकारणात प्रभाव पाडणाऱ्या महत्वाच्या मतदार संघापैकी एक म्हणजे भंडारा-गोंदिया लोकसभा मतदार संघ होय. गत मे महिन्यात झालेल्या पोटनिवडणुकीनंतर या मतदार संघाचे राजकीय समीकरण बदलले आहे. भाजपाच्या तिकीटावर निवडून आलेले नाना पटोले यांनी खासदारकीचा राजीनामा दिला आणि काँग्रेसमध्ये प्रवेश घेतला. त्यानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीने आपला गड भाजपाच्या ताब्यातून खेचून आणला. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत कोणता पक्ष कोण उमेदवार देतो याची प्रचंड उत्सुकता दिसून येत आहे.राष्ट्रवादी काँग्रेसकडून ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल यांचे नाव आघाडीवर आहे. सध्या ते राज्यसभेचे खासदार असल्याने त्यांच्या धर्मपत्नी वर्षा पटेल यांना लोकसभेच्या रिंगणात उतरविण्याची शक्यता आहे. विद्यमान खासदार मधुकर कुकडे यांनाही पुन्हा तिकीट मिळण्याची आशा आहे. प्रफुल्ल पटेल यांचे या मतदार संघावर पुर्वीपासूनच वर्चस्व आहे. तिकीट वाटपातही प्रफुल्ल पटेल यांचाच शब्द प्रमाण माणला जातो. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस तिकीट वाटपाच्या बाबतीत बिनधास्त दिसत आहे.दुसरीकडे नुकत्याच झालेल्या पोटनिवडणुकीत झालेल्या पराभवाचा वचपा काढण्यासाठी भाजपाही प्रभावी उमेदवाराच्या शोधात आहे. भंडाराचे नगराध्यक्ष सुनील मेंढे, आमदार डॉ. परिणय फुके आणि गोंदियाचे हेमंत पटले यांची नावे चर्चेत आहेत. जातीय समीकरणाचा आधार घेत भाजपा उमेदवारी देण्याच्या तयारीत आहे. भाजपाने उमेदवारीसाठी मतदार संघात सर्वेक्षण सुरू केले असून त्या माध्यमातून उमेदवाराचा शोध घेत आहेत. गत पोटनिवडणुकीत भाजपाच्या तिकीटावर पराभूत झालेले गोंदिया भाजपा जिल्हाध्यक्ष हेमंत पटले यांचीही भाजपाकडून उमेदवारीसाठी दावेदारी राहणार आहे. ऐनवेळी पक्ष उमेदवारीची माळ कुणाच्या गळ्यात टाकते हे मात्र लवकरच कळणार आहे.राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपा या निवडणुकीत सक्षमपणे उतरणार आहे. मात्र ऐनवेळी युती आघाडी झाली नाही तर शिवसेना आणि काँग्रेसही उमेदवारांची चाचपणी करीत आहे. काँग्रेसने गत आठवड्यात संभाव्य उमेदवारांकडून अर्ज मागविले होते. तर शिवसेनेही निवडणूक लढण्याची तयारी चालविली आहे.सहा पैकी पाच विधानसभा भाजपाच्या ताब्यातभंडारा-गोंदिया लोकसभा मतदार संघात सहा विधानसभा मतदार संघ आहेत. त्यापैकी तुमसर, भंडारा, साकोली, अर्जुनी मोरगाव आणि तिरोडा हे पाच मतदार संघ भाजपाच्या ताब्यात आहे. तर गोंदिया मतदार संघ काँगे्रेसकडे आहे. भाजपासाठी ही जमेची बाजू असून जातीय समीकरणाचा आधार घेवून उमेदवार निश्चित करण्याकडे त्यांचा कल आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पोटनिवडणुकीनंतर उत्सहाचे वातावरण आहे. शेवटी उमेदवारी कुणाला मिळते आणि मतदार राजा कुणाच्या गळ्यात विजयाची माळ टाकतो हे मात्र आगामी काळच ठरविणार आहे.
लोकसभा उमेदवारीची नागरिकात उत्सुकता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 04, 2019 11:00 PM
आगामी लोकसभा निवडणुकीत भंडारा-गोंदिया मतदार संघात कोणता पक्ष कुणाला उमेदवारी देतो याची प्रचंड उत्सुकता नागरिकांत आहे. प्रत्येक पक्षात अनेकजण इच्छुक असून उमेदवारीवरून राष्ट्रवादी काँग्रेस बिनधास्त दिसत आहे, तर भाजपात उमेदवाराची शोधाशोध सुरू आहे.
ठळक मुद्देभंडारा-गोंदिया मतदार संघ : राष्ट्रवादीतर्फे प्रफुल्ल पटेल, वर्षा पटेल तर भाजपाकडून सुनील मेंढे, परिणय फुके यांची नावे चर्चेत