काँग्रेस-राकाँ पदाधिकाऱ्यांत चर्चा : सत्तेसाठी ओढाताण होणार काय?लाखनी : नगरपंचायत निवडणुकांच्या निकालानंतर लाखनी शहर वासियांचे लक्ष नगराध्यक्षाच्या आरक्षणाकडे लागले होते. लाखनी नगर पंचायत नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलासाठी राखीव झाल्यानंतर सत्तेची समीकरण जुळविण्यासाठी चढाओढ सुरु झाली आहे. नगराध्यक्ष व उपाध्यक्ष या खुर्चीवर कोण विराजमान होणार याविषयी चर्चेला परिसरात उधाण आले आहे.नगरपंचायत निवडणुकात काँग्रेसला ७ भाजपाला ६, राष्ट्रवादी कांग्रेसला २ , अपक्ष २ पक्ष सांख्यीकिय आकडेमोड असतांनी कांग्रेसला स्वबळावर सत्ता स्थापन करता येणार नाही. त्यासाठी दुसऱ्या राजकीय पक्षांची किंवा अपक्ष उमेदवारांची मदत घ्यावी लागणारी आहे. त्या संदर्भाने काँग्रेस व राष्ट्रवादी कांग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची स्थानिक विश्रामगृहात चर्चा झाली. काँग्रेसचे माजी आमदार सेवक वाघाये, तालुका अध्यक्ष सुनील गिऱ्हेपुंजे, पप्पु गिऱ्हेपुंजे, अनिल निर्वाण, धनंजय तिरपुडे व राष्ट्रवादी काँग्रेसकडून जिल्हाध्यक्ष मधुकर कुकडे, नरेश डहारे, तालुका अध्यक्ष डॉ. विकास गभणे, अशोक चोले आदि उपस्थित होते. उभयतांमध्ये काँग्रेस-राकाँ युतीविषयी चर्चा करण्यात आली. त्यात काँगेसला नगराध्यक्ष पद तर राकाँला उपाध्यक्ष पद देण्याचे निश्चित करण्यात आल्याची चर्चा आहे. दोन सभापती पद काँगेसकडे ठेवण्यात येणार असल्याबद्दल बोलण्यात येत आहे. नगरपंचायत निवडणुकात काँग्रेसकडून नगरसेवक म्हणून ईश्वरदत्त गिऱ्हेपुंजे, सुरेखा निर्वाण, अनिल निर्वाण, भोला उईके, कल्पना भिवगडे, धनंजय तिरपुडे विजयी झाले आहेत. राष्ट्रवादी कांग्रेसचे धनु व्यास, दीपाली जांभुळकर विजयी झाले. कांग्रेस-राकॉ युती झाल्यास नगराध्यक्षपदाचा चर्चेत कल्पना भिवगडे यांचे नाव समोर आहे. कांग्रेस-राकॉ चचेर्त भिवगडे यांच्या नावाला हिरवी झेंडी दिल्याची चर्चा आहे. तसेच उपाध्यक्ष म्हणून धनु व्यास यांच्या नावाला दुजोरा देण्यात आला आहे.कांगे्रस-राकॉ युती झाल्याचे चिन्ह दिसत असले तरी शेवटच्या क्षणापर्यंत काय होईल हे सांगता येत नाही. काही राष्ट्रवादी नेते भाजपाशी संधान जुळविण्याचा प्रयत्नात आहेत. भाजपाचे ६, राकॉ २ व अपक्षांची मदत घेतली तर भाजपा, राकॉ यांची युती झाल्यास भाजपाचा नगराध्यक्ष बनु शकतो. कृषी उत्पन्न बाजार समितिमध्ये भाजपा-राकॉ अशी पॅनेल तयार करुन निवडणूक लढविण्यात आली होती. त्यात बऱ्यापैकी यश प्राप्त झाले होते. त्यामुळे राष्ट्रवादी कांग्रेसच्या हायकंमाडच्या निर्णयावर बरीच समिकरणे अवलंबून आहेत. काँग्रेसला सत्तेपासून दूर ठेवणारा एक गट कार्यश्रमपणे आपली भूमिका पार पाडण्याचा प्रयत्न करित आहे. कांग्रेसची सत्ता आली तर ते माजी आमदार सेवक वाघाये यांच्या मर्जीतील प्रतिनिधी असतील. वाघाये यांना दूर ठेवण्यासाठी कोणतीही राजकीय खेळी शेवटच्या क्षणापर्यंत होऊ शकते. (तालुका प्रतिनिधी)
नगराध्यक्ष निवडीकडे जनतेच्या नजरा
By admin | Published: November 16, 2015 2:05 AM