वीज अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष : वेळीअवेळी होतो विद्युत पुरवठा खंडीतलोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : मागील काही दिवसांपासून तापमानाने उच्चांक गाठला आहे. वाढत्या उष्णतेमुळे नागरिकांची ससेहोलपट होत असतानाच वीज वितरण कंपनीकडून वेळीअवेळी विद्युत पुरवठा खंडीत करण्यात येत आहे. तर काही ठिकाणी क्षमतेपेक्षा जास्त जोडणी झाल्याने विद्युत पुरवठा ‘ट्रीप’ होत आहे. यामुळे नागरिक त्रस्त झाले आहे. हा प्रकार मागील तीन दिवसांपासून गणेशपूरातील मंगल पांडे वार्डातील नागरिक अनुभवत असल्याने संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे.नागरिकांना नागरी सुविधा पुरविण्याची जबाबदारी नगरपालिका प्रशासनासह वीज वितरण कंपनीचीही तेवढीच आहे. नागरिकांकडून वीज जोडणीसाठी वीज वितरण कंपनीकडून वेळोवेळी विविध कर आकारणीच्या नावावर रक्कम घेतल्या जाते. मात्र विद्युत पुरवठा करताना वीज कंपनी कमी पडत आहे. सध्या उन्हाळ्याचा प्रखर सत्र सुरु असून तापमान ४५ अंशावर पोहचला आहे. यामुळे नागरिकांची मोठी फटफजीती होत आहे. अशास्थितीत वीज वितरण कंपनीकडून पुरवठा होणारा विद्युत पुरवठा नियमित होत नसल्याने नागरिकांसह छोट्या बाळांना याचा त्रास सहन करावा लागत आहे.भंडारा वीज वितरण कंपनीच्या अख्त्यारित दक्षीण क्षेत्रात मोठ्या प्रमाणात वीज कंपनीच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये समन्वयाचा अभाव दिसून येत आहे. मागील तीन दिवसांपासून मंगल पांडे वॉर्डातील नागरिकांना याचा फटका सहन करावा लागत आहे. राजस्व नगर, कृषी कॉलनी यासह गणेशपुरातील अन्य काही वसाहतींनाही रात्रीच्या सुमारास वीज खंडीतचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. रात्री साडेदहा च्या सुमारास विद्युत पुरवठा खंडीत होतो. तो तब्बल मध्यरात्री १ ते २ च्या सुमारास पुर्ववत होतो. दरम्यानच्या काळात या परिसरातील नागरिकांसह बच्चे कंपनींना उकाळ्याचा सामना करावा लागत आहे.वीज वितरण कंपनीने राजस्व वसाहतीत दिलेल्या विद्युत जोडण्या एका डीपीवरुन दिल्या आहेत. त्यामुळे क्षमतेपेक्षा जास्त ताण त्यावर आल्याने विद्युत पुरवठा खंडीत होत आहे. वीज वितरण कंपनीने ही समस्या लक्षात घेवून या परिसरात नव्याने एक डीपी येथे उभारल्यास वीज खंडीत होण्याचा प्रकार बंद होऊ शकतो.रात्री बालकांच्या रडण्याचा आवाजतापमानात वाढ झाली असल्याने आता प्रत्येक घरात कुलर, एसी व पंख्ये चालविल्याखेरीज गत्यंतर नाही. वीज पुरवठा खंडीत होत असल्याने या परिसरातील कुटुंबामध्ये असलेल्या बच्चे कंपनींना उकाळा असह्य होतो. त्यामुळे रात्रीच्या सुमारास वीज पुरवठा खंडीत झाल्यावर त्याच्या त्रासामुळे अनेक घरांमधून बालकांच्या रडण्याचा आवाज ऐकायला येतो. कर्मचारी बनले बेजबाबदारदक्षिण क्षेत्रात कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांवर वीज कंपनीने जबाबदारी सोपविली आहे. मात्र यातील कार्यरत कर्मचारी स्वत:ची जबाबदारी योग्यरित्या पार पाडण्यास कुचराईपणा करीत आहेत. कर्तव्यावर असतांना ग्राहकांना होणाऱ्या अडचणींची माहिती त्यांच्या भ्रमणध्वनीवर देण्याचा प्रयत्न केला असता ते बंद ठेवीत असल्याची बाब समोर आली आहे. त्यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे.कर्मचाऱ्यांमधील नेतेगिरीनागरिकांना सुविधा पुरविण्याची जबाबदारी वीज कंपनीच्या तांत्रिक कर्मचाऱ्यांवर सोपविली आहे. मात्र अनेक कर्मचारी रात्रपाळीवर कर्तव्यावर असतांना कार्यालयाला कुलूप लावून घरी गेलेले असल्याचे प्रकारही संतप्त नागरिकांनी अनुभवला आहे. अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्याला फैलावर घेतल्यास हे कर्मचारी ‘नेतेगिरी’ करुन कर्तव्यापासून दूर जाण्याचा प्रयत्न करतात.अख्खे कुटुंब घराबाहेरअघोषित वीज पुरवठा खंडीत होत असल्याने याचा फटका सोसावा लागणारे अख्खे कुटुंब घराबाहेर बसतात. गेलेली लाईट आता येईल, मग येईल, थोड्यावेळात येईल या भ्रामक कल्पनेत हे कुटुंब मध्यरात्रीपर्यंत जागून काढीत आहेत. अशास्थितीत डासांचाही मोठा उच्छाद राहत असल्याने नागरिक वीज कंपनीवर शिव्यांची लाखोळी वाहतात. तर अनेकजण वेळ काढून घेण्यासाठी मोबाईलवर व्हॉट्स अॅप, चॅटींग, गेम खेळत असल्याचे मागील तीन दिवसांपासून या परिसरात बघायला मिळत आहे.राजस्व नगर परिसरात क्षमतेपेक्षा जास्त जोडणी करण्यात आली आहे. त्यामुळे वीज पुरवठा खंडीत होण्याचा प्रकार वाढला आहे. वीज पुरवठ्याचा समतोल राहावा यासाठी आज कर्मचाऱ्यांनी त्यावर उपाय योजना केलेल्या आहेत. रात्रीला पुन्हा वीज खंडीत झाल्यास सकाळी त्यावर तांत्रिकदृष्टया उपाययोजना करुन नागरिकांचा त्रास कमी करण्याचा प्रयत्न करु.- व्ही. डी. पाथोडे, उपअभियंता, वीज वितरण कंपनी भंडारा.
तापमानासह लाईन ‘ट्रीप’चा नागरिकांना ताप
By admin | Published: May 17, 2017 12:25 AM