लाखांदूर तालुक्यात या वर्षात केवळ नांदेड रेती घाटाचे तीन वर्षांसाठी लिलाव करण्यात आले. हा घाट नागपूर येथील मोठ्या व्यक्तीस देण्यात आला आहे. घाट मालक हा सत्तारूढ पक्षातील एका बलाढ्य व्यक्तीचा निकटवर्तीय असल्यामुळे दबंगगिरी व मनमानीने घाट चालविला जात असल्याची ग्रामस्थांची तक्रार आहे. घाटाचा लिलाव झाल्यापासूनच घाटचालकाने शासन नियमांची पायमल्ली करत रेतीचा उपसा चालविला होता. दिवसा देखाव्यासाठी मजूर व ट्रॅक्टरच्या साहाय्याने, तर रात्रीच्या सुमारास थेट पोकलँडने रेतीचा उपसा करणे असा नित्यक्रम या घाटावर चालत होता.
दरम्यान, शासन निर्देशानुसार पावसाळा सुरू झाल्यानंतर गत १० जून २०२१ रोजी जिल्ह्यातील सर्वच रेती घाट बंद झाले असून, केवळ साठवणूक करून ठेवलेल्या रेतीची उचल व वाहतूक करण्याचे निर्देश प्राप्त होते. मात्र, नांदेड रेती घाट चालकाने केवळ आठवडाभर रेती उपसा बंद ठेवत पुन्हा शासन नियम धाब्यावर बसवून थेट पोकलँडने रेतीचा उपसा चालविला असून, सातत्याने अवैधरीत्या २५ ते ३० डंपर रेती वाहतूक केली जात आहे. यासह घाटाचे लिलाव झाले तेव्हा शासन व प्रशासनाकडून सीमांकन आखून देण्यात आले असताना, रेती घाट चालक सिमांकनाबाहेर जात नांदेड रेती घाटालगत असलेल्या ईटान घाटातून रेती उपसा करीत असल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी याकडे तातडीने लक्ष घालून घाट चालकांकडून अवैधरीत्या होत असलेला रेती उपसा थांबवून, ईटान रेती घाटातून उपसा न करता नांदेड रेती घाटातूनच उपसा करण्याची सक्ती करावी, अशी मागणी तंमुस अध्यक्ष विलास मांडवकर, सुरेश बावनकर, सोमेश्वर चोपकार, विठ्ठल साठवणे यांच्यासह अन्य ग्रामस्थांनी केली आहे.
बॉक्स
घाटचालक म्हणतात, गावगुंडांनी ट्रक अडविले?
नांदेड येथील गावकऱ्यांचे ट्रॅक्टर घाटावर डंपिंगसाठी लावण्यात आले होते. दरम्यान, घाटचालकांकडून थेट चार पोकलँडने रेतीचा उपसा केला जात असल्यामुळे गावकऱ्यांच्या ट्रॅक्टरना काम मिळत नाही. तसेच मजुरांचा रोजगार हिरावला गेला असल्यामुळे नांदेडवासीयांनी १६ ऑगस्ट रोजी बिना राॅयल्टीचे ट्रक थांबवून १७ ऑगस्टला जिल्हाधिकारी संदीप कदम यांना निवेदन सादर केले होते. त्यामुळे रेती घाटचालकांनी दि. १९ रोजी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करत ग्रामस्थांना गावगुंड संबोधून ते रेतीघाटावर धुमाकूळ घालत असल्याची तक्रार केली. अशाप्रकारे ग्रामस्थांना बदनाम करण्याचे षडयंत्र चालविले जात आहे.
कोट
रेती घाट सुरू झाल्यानंतर गावातील ट्रॅक्टर व काही मजुरांना घाटावर कामास ठेवण्यात आले होते. यामुळे गावातील शेकडो लोकांच्या हाताला काम मिळाले होते. मात्र, घाट चालकाने थेट चार पोकलँडच्या साहाय्याने रेती उपसा सुरू केला असल्याने मजुरांच्या हातचे काम हिरावले गेले आहे. त्यामुळे आम्ही बिना रॉयल्टीने रेती वाहतूक होत असलेले ट्रक थांबविले होते. मात्र, घाटचालकाने उलट निवेदनातून आम्हास गावगुंड व रेती तस्कर असा उल्लेख करत बदनामी केली आहे.
- विलास मांडवकर, माजी सरपंच तथा तंमुस अध्यक्ष, नांदेड.