इंद्रपाल कटकवार
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : वर्षभरात पेट्रोल आणि डिझेलच्या भावात सातत्याने वाढ होत आहे. इंधन दराच्या बाबतीत ही भरारी मात्र विमानात वापरल्या जाणाऱ्या इंधनाच्या दरापेक्षा फार अधिक आहे. पेट्रोल-डिझेल पेक्षाही चक्क विमानाचे इंधन स्वस्त असल्याचे दिसून येते. परिणामी सर्वसामान्यांना वाहन चालविणे कसे परवडणार? असा प्रश्न निर्माण झाला आहे. भंडारा शहरात पेट्रोलचा भाव प्रति लिटर १०९ रुपयांपर्यंत तर डिझेलचा भाव प्रति लिटर ९८ रुपयांच्या घरात पोहोचला आहे.
तर दुसरीकडे विमानासाठी लागणाऱ्या एटीएफ म्हणजेच एव्हिएशन टरबाइन फ्युल या इंधनाचा भाव प्रति लिटर ६० रुपये इतका आहे. परिणामी सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर पेट्रोल आणि डिझेलचे भाव जात असल्याने वाहन चालविणे सोडायचे काय? असा प्रश्नही मनात निर्माण होत आहे.
पगार कमी खर्चात वाढ
गत दीड वर्षभरात कोरोना काळात महागाईने चांगलाच उच्चांक निर्माण केला आहे. दरडोई उत्पन्नात हवी तेवढी प्रमाणात वाढ झाली नसली तरी आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाचे भाव कमी-जास्त होत असतानाही इंधनाच्या दरात मात्र सातत्याने वाढ होत गेली. तसेच त्यामानाने पगारात मात्र वाढ झालेली नाही. दोन वर्षांपासून पगार कमी आणि खर्च वाढले आहेत कौटुंबिक गाढा ओढायचा तरी कसा? असा प्रश्न निर्माण होत आहे
- रूपेश कानतोइे,
भंडारा
पेट्रोल आणि डिझेल या इंधनाच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. याचा परिणाम सरळसरळ वाहतूक सेवेवर पडत आहे. दुचाकीमध्ये आधी मी प्रती आठवड्याला दोनशे रुपयांचा पेट्रोल माझ्या दुचाकीत घालत होतो. मात्र आता ४०० रुपयांचे पेट्रोल आवागमनासाठी लागत आहे. परंतु त्या तुलनेत वेतनात कुठलीही वाढ झालेली नाही. ही बाब नक्कीच खिशाला कात्री लावणारी आहे. इंधनाचे दर कमी व्हायला हवे.
- रमेश लांजेवार,
भंडारा
कोरोनामुळे खर्चात भर; पाचशेच्या ठिकाणी हजार
गत दीड वर्षात कोरोना महामारीने सर्वांनाच त्रस्त करून सोडले आहे. अनेक लोकांचे उद्योगधंदेही बुडाले. हातावर कमविणे व पानावर खाणाऱ्यांचे तर हाल बेहाल झाले. कारोनामुळे खर्चात अधिकच भर पडली. ज्या ठिकाणी पाचशे रुपये लागायचे, आता तो खर्च हजार रुपयांच्या वर पोहोचला आहे. त्यात सर्वाधिक मार हा मध्यमवर्गीय व गरीब कुटुंबांना बसला आहे. आधीच आर्थिक भुर्दंड बसला असताना महागाईने त्यात चांगलीच भर घातली आहे. पगार कमी आणि खर्चात वाढ जास्त झाल्याने कुटुंबाचा गाडा ओढायचा कसा? असा प्रश्न निर्माण झाला आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर आर्थिक घडी व त्याची गती रुळावर आली असली तरी हव्या त्या प्रमाणात आर्थिक लाभ होत नसल्याचे दिसून येत आहे.