लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : आजच्या काळात फुले - आंबेडकरी विचार हेच लोकशाही क्रांतीचे मुख्य सूत्र आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ आंबेडकरी विचारवंत डॉ.यशवंत मनोहर यांनी केले. तुमसर शहरातील छत्रपती फाऊंडेशनतर्फे आयोजित क्रांतीसूर्य जोतीराव फुले व डॉ.बाबासाहेब आंबेडकर संयुक्त जयंतीनिमित्त प्रबोधन कार्यक्रमात ते बोलत होते.या कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉ.यशवंत मनोहर तर उद्घाटक म्हणून तुमसरचे उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम साळी उपस्थित होते.यावेळी डॉ.यशवंत मनोहर म्हणाले, आजच्या काळात माणुसपणाची भावना कमी होवून धार्मिक, सांप्रदायिक, जातीय व लिंगभावात्मक विषमता, तेढ वाढत आहे. अशा काळात समाजात सलोखा निर्माण करावयाचा असेल तर फुले - आंबेडकरी विचारातील विवेक स्वीकारून समाजाचे वैचारिक उत्तयन करावे लागेल. फुले-आंबेडकरांचा परिवर्तनवादी विचार म्हणजे संपूर्ण समाजाला एकसंघ ठेवणारी गुरुकिल्ली आहे.समाजातील निरनिराळ्या जाती व धर्माच्या लोकांना भगिनीभाव व बंधूभाव शिकविणारी ती वाट आहे. जातीअंताची व स्त्री मुक्तीची ती नेमकी दिशा आहे. आजच्या अराजक हुकुमशाहीचा पराभव आपण फुले-आंबेडकरी विचारामधून करू शकतो. म्हणून सर्वांनीच महामानवांना अभिप्रेत असणारा धर्मनिरपेक्ष समाजवाद आणण्याकरिता कटीबद्ध राहावे.वर्तमानातील वाढत्या जातीय धार्मिक दुराव्यामुळे पुरोेगामी, परिवर्तनवादी चळवळींपुढे आव्हान निर्माण झाले आहे. म्हणूनच तुमसरमधील मराठा सेवा संघ, जोशाबा, समता सैनिक दल, सत्यशोधक शिक्षक सभा, डॉ.बाबासाहेब आंबेडकर सोशल फोरम, जिजाऊ ब्रिगेड संभाजी ब्रिगेड, अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती आदी संघटनांनी एकत्र येऊन छत्रपती फाउंडेशनची स्थापना केली आहे.फुले - आंबेडकरांच्या त्यागमय जीवनाची प्रेरणा घेत छत्रपती फाउंडेशनच्या अनेक कार्यकर्त्यांनी देहदान, नेत्रदान व अवयवदानाचा अभिनव कार्यक्रम या निमित्ताने घेतला. या कार्यक्रमाला प्रामुख्याने प्रकाश राठोड, गणेशराव बर्वे, डॉ.राहुल भगत, अल्पेश घडले, चंद्रकांत लांजेवार, राजूभाऊ चामट, डॉ.प्रिदर्शना शहारे, राजेंद्र डांगे, टेंभुर्णे, अमरिश सानेकर, नासिर भाई, पठाण आदी हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन, बौद्ध बांधव भगिनी उपस्थित होते. तसेच तुमसर शहरातील गणमान्य व्यक्ती मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्र संचालन प्रा.राहुल डोंगरे यांनी केले. प्रास्ताविक प्रा.रेणुकादास उबाळे यांनी केले.
फुले-आंबेडकरी विचार हेच आजचे क्रांतीसूत्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2018 1:45 AM
आजच्या काळात फुले - आंबेडकरी विचार हेच लोकशाही क्रांतीचे मुख्य सूत्र आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ आंबेडकरी विचारवंत डॉ.यशवंत मनोहर यांनी केले. तुमसर शहरातील छत्रपती फाऊंडेशनतर्फे आयोजित क्रांतीसूर्य जोतीराव फुले व डॉ.बाबासाहेब आंबेडकर संयुक्त जयंतीनिमित्त प्रबोधन कार्यक्रमात ते बोलत होते.
ठळक मुद्देडॉ.यशवंत मनोहर : तुमसर येथे व्याख्यानमाला