युवराज गोमासे।लोकमत न्यूज नेटवर्ककरडी (पालोरा) : ग्रामीण विद्यार्थ्यांना शालेय शिक्षणाबरोबर आधुनिक तंत्राने शेतीची मशागत व कमी जागेत अधिक उत्पादनाचे गुण आत्मसात करता यावे, या हेतूने जि.प. पूर्व माध्यमिक शाळा निलज खुर्दच्या शिक्षकांनी शाळेच्या आवारातील १० आर जागेत विद्यार्थ्यांच्या माध्यमातून परसबाग फुलविली. त्यांचा संकल्पातून विविध भाजीपाल्याच्या उत्पादन घेण्यात आले. विद्यार्थ्यांत श्रमप्रतिष्ठेचे मुल्य रूजविण्यात शिक्षकांना यश आले. पुन्हा नव्याने उन्हाळी भाजीपाला पिकांची लागवड करण्याची लगबग शाळेत सुरू आहे.जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक शाळा निलज खुर्द येथे कार्यानुभव अंतर्गत शासनाद्वारे सन २०१६-१७ मध्ये प्राप्त १०,०५७ रूपयांच्या परसबाग निधीचा पुरेपूर वापर करण्याचा संकल्प मुख्याध्यापक नरेश देशमुख यांनी केला. आपल्या कल्पनांना मुर्त रूप देण्यासाठी शाळा समिती, शिक्षक व विद्यार्थ्यांसमोर आपली संकल्पना मांडली. सर्वांना ती प्रेरणादायी वाटल्याने त्यांच्या मेहनतीचा परिणाम म्हणून आज शाळेत शालेय पोषण आहाराला उपयुक्त असा सर्व प्रकारचा भाजीपाला शाळेत पिकविला जात आहे.सन २०१७-१८ च्या शैक्षणिक वर्षाच्या सुरूवातीला प्रत्यक्ष कार्यानुभवाचा श्री गणेशा करण्यात आला. शाळा समिती अध्यक्ष मोहन बोंदरे यांचे ट्रॅक्टरच्या मदतीने जमिनीची मशागत करून लागवड योग्य करण्यात आली. मुख्याध्यापक नरेश देशमुख, शिक्षक टी.के. मानकर, एम.जी. पवार, गिता सतदेवे व विद्यार्थ्यांच्या श्रमदानातून परसबागेत वांगे, टमाटर, भेंडी, गवारशेंग, तूर, चवळी, मुळा, कांदे, लसून, बटाटा, मेथी, पालक, सांबार, वालाची शेंग, फुल झाडे, फळझाडे, कोचईचे पाने आदींची लागवड करण्यात आली. शाळेतील बोरवेल्सच्या माध्यमातून सिंचन व योग्य खताच्या मात्रा व निगा राखल्या गेल्याने शाळेत या पिकांचे भरघोष उत्पादन घेतले गेले.या भाजीपाल्याचा वापर पोषण आहारात केला जात असल्याने मुलांना आवश्यक असे खनीजे, प्रथीने व उष्मांक यातून मिळत आहे. या उपक्रमातून कमी जागेत अधिक उत्पादन काढणे व भविष्यात विद्यार्थ्यांना श्रमप्रतिष्ठा या मुल्यांवर भर देण्यात आला. सर्वधर्म समभावाची जपणूक यातून केली आहेकोणतेही कार्य लहान किंवा मोठे नसते. आधी करा, मग सांगा, यासाठी प्रत्यक्ष कामे करवून दाखवणे मोलाचे असते.शाळेत सर्वांच्या सहकार्यातून परसबाग फुलविण्यात आली. याचा सार्थ अभियान गावाला व शाळेला आहे.-नरेश देशमुख, मुख्याध्यापक जि.प. पूर्व माध्यमिक शाळा निलज खुर्द.शाळेत परसबाग लावण्याची संकल्पना आमच्यासाठी नाविन्यपूर्ण होती. परंतु नवीन कार्यातून प्रेरणा व अनुभव मिळत असतो. विद्यार्थी व शिक्षकांबरोबर शाळा समितीने सुद्धा मदत केली. त्यामुळे या संकल्पनेला यश आले.-मोहन बोंदरे, शाळा समिती अध्यक्ष निलज बुज.
श्रमप्रतिष्ठेचे मूल्य रूजविण्यासाठी फुलविली परसबाग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2018 9:14 PM
ग्रामीण विद्यार्थ्यांना शालेय शिक्षणाबरोबर आधुनिक तंत्राने शेतीची मशागत व कमी जागेत अधिक उत्पादनाचे गुण आत्मसात करता यावे, या हेतूने जि.प. पूर्व माध्यमिक शाळा निलज खुर्दच्या शिक्षकांनी शाळेच्या आवारातील १० आर जागेत विद्यार्थ्यांच्या माध्यमातून परसबाग फुलविली.
ठळक मुद्देलोकमत शुभवर्तमान : १० आर जागेत भाजीपाला पिकांचे उत्पादन, निलज शाळेचा उपक्रम