चुल्हाड (सिहोरा) : सिंदपुरी, चुल्हाड, वाहनी गावांना जोडण्यासाठी मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेंतर्गत डांबरीकरण व सिमेंट रस्ता मंजूर करण्यात आलेला असला तरी या कामात विना रॉयल्टीचा मुरूम उपयोगात आणला जात आहे. भूमाफियांनी हजारो ब्रास मुरुमाचे अवैध उत्खनन वन विभागाच्या जागेतून केले आहे. सिमेंट रस्त्यालगत मुरूम घालण्यात आला असता ५०० मीटर अंतरावर असणाऱ्या तलाठी कार्यालयात माहिती मिळाली नाही. यामुळे गावकऱ्यांच्या भुवया उंचावल्या आहेत. निश्चितच अवैध मुरूम खोदकामात घबाड करण्यात आल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे.
सिहोरा परिसरात गावांना थेट राज्य मार्गाला जोडण्यासाठी मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेंतर्गत डांबरीकरण, खडीकरण रस्ते बांधकामाला मंजुरी देण्यात आली आहे. एकाच रस्त्याचे दोनदा भूमिपूजन करण्यात आल्याचा अनुभव नागरिकांनी घेतला आहे. परंतु, नव्या दमाने रस्त्याची कामे सुरू करण्यात आली नाहीत. कंत्राटदाराने निधी नसल्याचे सांगत ऐन पावसाळ्यात ग्रामीण रस्ते थेट खड्ड्यात ठेवले आहेत. या खड्ड्यांत पाणी साचल्याने अपघाताची शृंखला सुरू झाली आहे. रस्ता डांबरीकरण पूर्ण करण्यासाठी नागरिक ओरड करीत आहेत. परंतु, कुणी ऐकायला तयार नाहीत. सिंदपुरी, चुल्हाड, वाहनी या गावांना जोडणाऱ्या रस्त्याचे डांबरीकरण, सिमेंट रस्ता, खडीकरण मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेंतर्गत मंजूर करण्यात आले आहे. ६ किमी अंतराच्या मार्गासाठी चार कोटी ५५ लाख १५ हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून, रस्ता मजबुतीकरणचे कंत्राट एन. एन. पुगलिया यांना देण्यात आले आहे. या मार्गावर १२ मोरी बांधकाम मंजूर करण्यात आले आहे.