वरठी : रेल्वे फाटकावर फूट ब्रिज मंजूर झाल्याच्या घोषणेला एक दशक उलटले. निवडणूक पूर्व व त्यानंतर अनेकदा फूट ब्रिज होणार असल्याच्या राजकीय गर्जना वल्गना ठरल्या. फूट ब्रिजअभावी नागरिकांना जीव मुठीत घेऊन ये-जा करावी लागत आहे. रेल्वे रुळ ओलांडताना जीवाचा धोका तर आहेच याव्यतिरिक्त रेल्वे पोलिसांनी पकडल्यास आर्थिक भुर्दंड व मानसिक त्रासाची पुरवणी सोबतीला मिळते. फूट ब्रिज नसल्याने नागरिकांचा हकनाक बळी जात आहे. फूट ब्रिजसाठी नागरिकात कमालीचा असंतोष आहे.
भंडारा रोड रेल्वे स्थानक समस्यांचे माहेरघर आहे. लोकप्रतिनिधींचे दुर्लक्षित धोरण याला कारणीभूत आहे. स्थानिक लोकप्रतिनिधी हे उदासीन असून त्यांना विकास म्हणजे फक्त रस्ते-नाल्या पलीकडे समजत नसल्याचे दिसते. विकास कामे करायची नाही आणि दुसऱ्याला करू द्यायची नाही अशी राजकीय अवस्था आहे. यामुळे गावाचा विकास खुंटला आहे. दूरदृष्टीचा अभाव असल्याने जिल्ह्याचे मुख्य रेल्वे स्थानक असूनही उपेक्षित आहे. दोन दशकापासून गावात एकहाती सत्ता आहे. पण विकासाच्या नावावर कामगिरी शून्य असे चित्र आहे. फूट ब्रिज नसल्याने शालेय विद्यार्थ्यांसह नागरिकांना जीव धोक्यात घालून रेल्वे रुळ ओलांडून ये-जा करावी लागत आहे.
रेल्वे स्थानकामुळे गावाचे दोन समांतर भागात विभाजन झाले आहे. दोन्ही भागात समांतर वस्ती असल्याने नागरिकांना एका बाजूने दुसरीकडे ये-जा करावी लागते. गत दशकात गावाची लोकसंख्या झपाट्याने वाढली. दोन्ही भागात व्यापार पेठ, शाळा, महाविद्यालय, शासकीय व खासगी रुग्णालय यासह लोकवस्ती आहे. वरठी हे केंद्रीय गाव असल्याने परिसरातील अनेक गावाचा सरळ संबंध वरठीशी येतो. त्यामुळे या गावाला अनन्यसाधारण महत्व प्राप्त झाले आहे. एका बाजूने दुसरीकडे जाण्यासाठी सोयीचा मार्ग नसल्याने नागरिकांना जीव धोक्यात घालून रेल्वे रूळ ओलांडून जावे लागते.
बॉक्स
रेल्वे फाटक ठरतेय डोकेदुखी
नागरिकांना ये-जा करण्यासाठी एकमात्र रेल्वे फाटक आहे. रेल्वे गाड्यांची संख्या जास्त असल्याने बहुतांश वेळा रेल्वे फाटक बंद राहते. वर्दळीच्या काळात ही फाटक बंद असल्याने नागरिकांना नियम तोडून रेल्वे रूळ ओलांडून ये-जा करावी लागते. रेल्वे रूळ वळणाने गुन्हा असल्याने त्यांना याचा फटका बसतो. घाईगडबडीत फाटक क्रॉस करताना नकळत अपघात सारख्या घटनांना सामोरे जावे लागते. रेल्वे फाटक बंद राहत असल्याने तासनतास नागरिकांना प्रतीक्षा करावी लागते. रेल्वे फाटक डोकेदुखी ठरली आहे.
बॉक्स
रेल्वे पोलिसांची धरपकड
रेल्वे रुळ ओलांडणे व विना तिकीट रेल्वे परिसरात जाणे नियमानुसार गुन्हा आहे. पर्याय नसल्याने नियम डावलून जाण्याशिवाय पर्याय नाही. रेल्वे फाटकासमोर नेहमी गर्दी राहते. या गर्दीचा फायदा रेल्वे पोलिसांना होतो. पादचारी रेल्वे फाटक क्रॉस करून निघण्याचा प्रयत्न करताना दबा धरून असलेले रेल्वे सुरक्षा दलाचे जवान त्यांना ताब्यात घेतात व आर्थिक दंडाची वसुली करतात. अनेकदा नागरिकांना दिवसभर ताटकळत बसवून ठेवण्यात येत असल्याने मानसिक त्रास सहन करावा लागत आहे.
प्रस्ताव धूळखात
फूट ब्रिजबाबत रेल्वे विभागाची संपूर्ण कारवाई पूर्ण झाली असल्याची माहिती विभागीय रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य सेवक कारेमोरे यांनी दिली. रेल्वे फाटकावर ब्रिज तयार करण्याचे नियोजन अहवाल राज्य शासनाकडे पडून आहे. सुरुवातीला फूट ब्रिजचे आकारावरून नियोजन रखडले होते . पण सदर प्रकरण निवळले असून राज्य शासनाच्या दफ्तारी फूट ब्रिजचे प्रस्ताव धूळखात असल्याची माहिती त्यांनी दिली. कोविडचे कारण पुढे करून प्रकरण पेंडिंग असल्याची माहिती मिळाली आहे.