कोका अभयारण्यातील जंगल सफारी सुरुवात झाली आहे. दिवाळीत मोठ्या प्रमाणात पर्यटकांनी जंगल सफारीचा व निसर्ग पर्यटनाचा आनंद उपभोगला आहे. तणावमुक्तीसाठी व कंटाळा दूर करण्यासाठी शहरातील नागरिक हौसेने कुटुंबासह जंगल सफारीला कोका अभयारण्यात येतात. परंतु पलाडी मार्गे कोका अभयारण्यात येणाऱ्या पर्यटकांना खडतर रस्त्यांचा सामना करावा लागतो आहे.
परिणामी जंगल सफारीवर येणाऱ्या पर्यटकात कमालीचा असंतोष व्यक्त होत आहे. अभयारण्यात टेकेपार गेटपासून चंद्रपूर अगोदरच्या रेंगेपार फाट्यापर्यंत सुमारे ७ ते ८ किमी अंतरापर्यंतचा रस्ता कमालीचा उखडला आहे. बीबीएम उखडले असून वाहनांचे नुकसान होत आहेत. वाहन पंक्चर होण्याचे प्रमाण वाढीस लागले आहे. या प्रवासात कुठेही वाहन दुरुस्तीचे दुकान नसल्याने अडचणीत वाढ झालेली आहे. पर्यटकांच्या सुविधेत भर पडण्यासाठी पलाडी-टेकेपार-चंद्रपूर ते कोका मुख्य रस्त्याच्या दुरुस्तीची मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.
बॉक्स
रोजगार वाढीसाठी रस्त्याची दुरुस्ती करा
कोका अभयारण्याच्या निर्मितीनंतर क्षेत्रातील पर्यटन विकासाला चालना मिळाली आहे. अनेकांना रोजगाराचे साधन उपलब्ध झाले आहे. पर्यटकांवर अनेकांच्या उपजीविका अवलंबून आहेत. परंतु रस्त्याच्या दुरवस्थेमुळे पर्यटनीय विकासाला खीळ बसली आहे. रस्त्याची दुरुस्ती करून विकासाला चालना देण्याची मागणी जिल्हा परिषद माजी सदस्य उत्तम कळपाते, प्रभूजी फेंडर, हितेश सेलोकर, नितू सेलोकर, सुजाता फेंडर यांनी केली आहे.