मध्यप्रदेश राज्याला जोडणाऱ्या तुमसर बपेरा राज्य मार्गाची अवस्था जीवघेणी झाली आहे. यामुळे वाहनधारकांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे. २८ किमी लांब असणाऱ्या या राज्य मार्गावरून वाहन चालवताना कसरत करावी लागत आहे. राज्य मार्गाचे कडेला असणारी झुडपे अपघाताला कारणीभूत ठरत आहेत. बिनाखी ते बपेरा या गावापर्यंत राज्य मार्गावर खड्डेच खड्डे झाले आहेत.
राज्य मार्गावर खिंड पडली असल्याने वेगान धावणारी वाहने आदळत आहेत. वाहनाचे एक चाक खड्ड्यातून निघताच दुसरे चाक खड्यातच राहत आहे. यामुळे खड्डे वाचवताना कमालीची कसरत करावी लागत आहे.
प्रवास करताना वाहन धारकांचे नाकी नऊ येत आहे. परंतु सार्वजनिक बांधकाम विभाग गांभीर्याने घेत नाही. यामुळे नागरिकांत संताप निर्माण झाला आहे. या राज्य मार्गावर खोल खड्डे पडले आहेत. राज्य मार्ग दुरुस्तीची ओरड सुरू झाली आहे.
मध्यंतरी सार्वजनिक बांधकाम विभागाचे यंत्रणेने राज्य मार्गाचे अवलोकन केले आहे. परंतु खड्डे बुजविण्याचे कामांना सुरुवात करण्यात आली नाही. सार्वजनिक बांधकाम विभागाची यंत्रणा गांधारीच्या भूमिकेत राहत आहे.
राज्य मार्गाचे नूतनीकरणाकरीता निविदा काढण्यात आले असल्याची माहिती मिळाली आहे. परंतू निविदा धारकाने कामांना सुरुवात केली नाही. राज्य मार्ग दुरुस्तीकडे सार्वजनिक बांधकाम विभागाची यंत्रणा दुर्लक्ष करीत असल्याने त्रास होत आहे. राज्य मार्गवरून नाकडोंगरी राज्य मार्गावरील वाहतूक वळती करण्यात आल्यानंतर दोन पदरी राज्य मार्गावरून चार पदरीची वाहतूक सुरु आहे. या राज्य मार्गावर ब्रेकर नसल्याने वाहने भरधाव वेगाने धावत आहेत. यामुळे आणखी कुणाचा बळी जाईल सांगता येत नाही. जनतेच्या सुरक्षतेची जबाबदारी सांभाळणाऱ्या एका पोलिसाने वाहन धारकांविषयी दया दाखवत मुरुमाचे गतिरोधक तयार करणार असल्याची माहिती दिली आहे.
बॉक्स
चुल्हाड ते सुकली नकुल मार्गाची स्थिती ठीक नाही. एक कोटी रुपये खर्चून डांबरीकरण करण्यात आले आहे. महिनाभरात डांबरीकरण रस्त्यावर खड्डेच खड्डे पडले असल्याचे लक्ष वेधले होते. निकृष्ट बांधकामाचे आरोप गावकऱ्यांनी केले आहेत. कन्स्ट्रक्शन कंपनीची यंत्रणा यानंतर खडबडून जागी झाली. खड्ड्यात पँचेस लावण्यात आले. परंतु या मार्गाचे दुर्दैवच म्हणावे लागेल, पँचेसही उखडण्यास सुरुवात झाली आहे. पुन्हा खड्डे दिसू लागले आहेत. पाच वर्षापर्यंत देखभाल आणि दुरुस्तीसाठी करारबद्ध असले तरी ठिगळ असणाऱ्या रस्त्यावरूनच नागरिकांना प्रवास करावा लागत आहे. गुणवत्तापूर्ण रस्ते बांधकामात कंपन्या नापास झालेल्या आहेत. मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेच्या कामांची चौकशी करण्याची मागणी तालुका उपाध्यक्ष विनोद पटले यांनी केली आहे.