साकोली ते भंडारा या राष्ट्रीय महामार्गावर साकोलीपासून अवघ्या तीन किलोमीटर अंतरावरील जांभळी ते मुंडीपार हा जंगल शिवारातील राष्ट्रीय महामार्गाला मोठमोठे खड्डे पडलेले आहेत. दरवर्षीच्या पावसाळ्यात या महामार्गावर मोठमोठाले खड्डे पडतात व अनेक अपघात होऊन अनेकांना आपला जीव गमवावा लागतो. शासन दरबारी नोंदीनुसार तीन वर्षांत आठ जणांचे प्राण या खड्ड्यांमुळे गेलेले आहेत, तर १५ जण गंभीररीत्या जखमी झालेले आहेत. दोन दिवसांपूर्वीच प्रा.बहेकार यांचे अपघाती निधन झाले. यावेळी नागरिकांचा रोज रोष हायवे विभागावर होता. अनेक सामाजिक संघटनांनी यावर तातडीने उपाययोजना करण्यात यावी, अशा सूचना केल्या होत्या. पोलीस विभागाने तर संबंधित विभागाला पत्र पाठवून तत्काळ रस्ता दुरुस्तीची मागणी केली होती. मात्र, दोन दिवस उलटूनही अजूनपर्यंत या रस्त्यावरील खड्डे बुजविण्यात आले नाही. त्यामुळे प्रशासनाचे दुर्लक्ष व पडलेले खड्डे हे किती धोकादायक आहेत, याची कल्पनाच न केलेली बरी. संबंधित विभागाने तत्काळ खड्डे बुजविण्यात यावे, अशी मागणी महात्मा गांधी तंटामुक्तीचे माजी अध्यक्ष रामू लांजेवार यांनी केली आहे. दोन दिवसांत खड्डे बुजविण्यात आले नाहीत, तर संबंधित विभागासमोर आंदोलनाचा इशाराही लांजेवार यांनी दिला आहे.
अपघातानंतरही खड्डे बुजविण्यात आले नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2021 4:36 AM