लाेकमत न्यूज नेटवर्कभंडारा : गोसेखुर्द प्रकल्पाचे पाणी प्रदूषित होण्यासाठी नाग नदीसोबतच इतरही घटक जबाबदार आहेत. नाग नदीच्या प्रदूषणाबाबत शासन स्तरावर प्रयत्न सुरू आहेत. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी गेल्या सोमवारी वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेतली. यात त्यांनी गोसीखुर्द प्रकल्प प्रदूषणमुक्त करण्यासाठी आराखडा तयार करण्याची सूचना दिली. गोसीखुर्दच्या पाण्याचे प्रदूषण थांबविण्यासाठी सर्वस्तरावर प्रयत्न सुरू असल्याची माहिती गोसेखुर्द प्रकल्पाचे मुख्य अभियंता आशिष देवगडे यांनी येथे दिली.जलजागृती सप्ताहाचे आयोजन १६ ते २२ मार्चपर्यंत करण्यात आले आहे. या सप्ताहाचे उद्घाटन वैनगंगा नदीचे जलपूजन करून बुधवारी येथे करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी संदीप कदम होते. प्रमुख पाहुणे म्हणून कार्यकारी अभियंता अ. वि. फरकडे, रा. गो. शर्मा, प्रशांत गोडे, सुहास मोरे, संदीप सातपुते, रवींद्र बानुबाकोडे, उल्हास फडके, मिलिंद जोशी उपस्थित होते. पृथ्वीवर पाणी मुबलक प्रमाणात असूनही प्रत्यक्ष वापरायोग्य पाणी अत्यंत कमी आहे. याचे कारण म्हणजे जलस्त्रोताचे प्रदूषण. पाण्याचा काटकसरीने वापर होणे जेवढे महत्त्वाचे आहे तेवढेच पाण्याचे प्रदूषण न करता गुणवत्ता राखणे महत्त्वाचे आहे, असे जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी सांगितले. यावेळी अधीक्षक अभियंता ज. द. टाले यांनी जलजागृती सप्ताहाचे उद्दिष्ट स्पष्ट केले. प्रास्ताविकेतून कार्यकारी अभियंता अ. वि. फरकडे यांनी जलसंपदा विभागाद्वारे लोकसहभागातून घेण्यात येणाऱ्या विविध कार्यक्रमांची माहिती दिली.यावेळी मोटारसायकल रॅलीला जिल्हाधिकारी संदीप कदम व मुख्य अभियंता आशिष तु. देवगडे यांनी हिरवी झेंडी दाखवून सुरुवात केली. यात नागरिक सहभागी झाले होते.