भंडारा :वाघांची संख्या वाढविण्यासाठी व वाघांचे नर-मादी गुणोत्तर राखण्यासाठी नागझिरा अभयारण्यात दोन वाघिणींना सोडण्याची योजना वनक्षेत्रात अचानक आलेल्या रानटी हत्तींमुळे रखडली आहे.
नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पात (एनएनटीआर) नर वाघांची संख्या जास्त असल्याने तेथे दोन वाघिणी आणण्याची योजना आखण्यात आली आहे. त्यानुसार ब्रम्हपुरीच्या जंगलातून वाघिणीला आणून २० नोव्हेंबरनंतर केव्हाही भंडारा जिल्ह्यातील वनक्षेत्रालगत असलेल्या नागझिरा अभयारण्यात सोडण्याची तयारी सुरू होती. मात्र, त्याचदरम्यान जंगली हत्तींचा कळप जिल्ह्यात शिरला. त्यामुळे भंडारा वन्यजीव विभागाला वाघिणींना अभयारण्यात सोडण्याची योजना तातडीने थांबवावी लागली.
आता जंगलात आलेल्या हत्तींचे योग्य व्यवस्थापन केल्यानंतरच वाघिणींना अभयारण्यात सोडण्याच्या दिशेने कार्यवाही केली जाणार असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. त्यामुळे वाघिणींना अभयारण्यात सोडण्याचे काम लांबणार आहे. वाघांचा नर-मादी समतोल राखण्यासाठी एनटीसीए (राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण)ने गेल्यावर्षी नागझिरा अभयारण्यात वाघिणींना सोडण्याचा प्रस्ताव मंजूर केला होता व त्याची अंमलबजावणी यावर्षी २० नोव्हेंबरनंतर होणार होती. मात्र, अखेरच्या क्षणी हत्तींनी भंडारा विभागातील जंगलात प्रवेश केला. हे हत्ती नागझिरा अभयारण्यात येण्याची शक्यता पाहता, या वाघिणींना आणून तेथे सोडण्याची योजना विभागाने पुढे ढकलली होती.
एनएनटीआरमध्ये १६ वाघ
नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पात अभयारण्यात पूर्ण वाढ झालेल्या वाघांची संख्या १६ इतकी नोंदविली गेली आहे. त्यापैकी बहुतेक नर आहेत. वाघांची संख्या कमी असल्याने नर-मादी गुणोत्तर राखण्यासाठी इतर ठिकाणच्या वाघिणींना तेथे सोडण्याची योजना आखण्यात आली आहे. भंडारा जिल्ह्यात येणाऱ्या कोका अभयारण्यातील वाघांची संख्या ४ असून, पवनी-उमरेड-कऱ्हांडला वन्यजीव अभयारण्यात वाघांची संख्या ५ आहे. भंडारा वन विभागाच्या अखत्यारीत येणाऱ्या वनक्षेत्रात नर व मादी वाघांची संख्या मोठी आहे.
हत्ती सध्या भंडारा विभागात आहेत. वाघिणींना अभयारण्यात सोडण्याच्या योजनेशी त्याचा थेट संबंध नाही. ऑपरेशन्स रितसर सुरू आहेत आणि हत्तींमुळे ते स्थगित करण्यात आलेली नाहीत. निश्चित योजनेनुसार वाघिणींना अभयारण्यात सोडण्यात येणार आहे. यासाठी कोणतीही निश्चित टाइमलाइन नाही.
- पवन जेफ, उपसंचालक, नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्प