भंडारा तालुक्यातील चिखली येथे कृषिभूषण पुरस्कारप्राप्त शेतकरी तानाजी गायधने यांच्या शेतावर बीबीएफ पद्धतीने सोयाबीन पिकाच्या पेरणीच्या प्रात्यक्षिकाच्या दरम्यान त्या बोलत होत्या. भंडारा तालुका कृषी विभागाच्या वतीने चिखली, खरबी, परसोडी येथे कृषी संजीवनी मोहीम राबविण्यात आली. यावेळी शेतकऱ्यांना बीजप्रक्रिया व रुंद वरंबा सरी पद्धतीने सोयाबीन लागवड करण्याविषयी प्रात्यक्षिकांसह मार्गदर्शन करण्यात आले. पुरेसा पाऊस झाला असून, शेतकऱ्यांनी सोयाबीनची पेरणी करताना बुरशीनाशक, कीटकनाशक, रायझोबियम, पीएसबी, ट्रायकोडर्माची बीजप्रक्रिया करूनच सोयाबीनची पेरणी करावी, त्यामुळे उत्पादनात १० ते १५ टक्क्यांनी वाढ होते. त्याचप्रमाणे, रासायनिक खतात बचत होऊन उत्पादन खर्च कमी होण्यास मदत होत असल्याचे कृषी सहायक रेणुका दराडे यांनी सांगितले. यावेळी शेतकऱ्यांनी आपले अनुभव कथन केले. चिखली येथील शेतकरी तानाजी गायधने यांनी बीएफ पद्धतीने पेरणी केल्याने बियाण्याची बचत होऊन वेळ व खर्चातही मोठी बचत झाल्याचे सांगितले. कृषी सहायक दराडे यांनी शेतकऱ्यांनी चालू हंगामात सोयाबीन पेरणी करताना पारंपरिक पद्धतीने पेरणी करण्याऐवजी रुंद वरंबा सरी पद्धतीने लागवड करावी. त्यामुळे पिकांमध्ये पाणी साचून न राहता, जास्तीचे पाणी सरीतून बाहेर काढणे सोपे जाते, तसेच रुंद वरंबा सरी पद्धतीमुळे पिकांमध्ये हवा खेळती राहून कीड व रोगाचा प्रादुर्भाव कमी होत असल्याचे सांगितले.
कोट
शेतकऱ्यांनी सोयाबीन पिकासाठी रुंद वरंबा सरी पद्धतीचा अवलंब करावा. यामुळे जास्तीचा पाऊस पडला, तरी ते पाणी सरीवाटे निघून जाते व कमी पाऊस पडला, तरीही वरंब्याद्वारे ओलावा राहत असल्याने पिकांना पुरेसे पाणी उपलब्ध होते. त्यामुळे बीबीएफ पद्धत शेतकऱ्यांसाठी फायदेशीर आहे.
रेणुका दराडे, कृषी सहायक, परसोडी
बॉक्स
बीबीएफ पद्धतीचे फायदे बीबीएफ यंत्राच्या साह्याने आवश्यक रुंदीचे वरंबे दोन्ही बाजूने सऱ्यांसह तयार करणे, पेरणी करणे व खते देणे अशी विविध कामे एकाच वेळी करता येतात. मजुरांची ६० टक्के बचत होते. सरासरी पाच ते सात टक्के क्षेत्रावर प्रति दिन पेरणी होते. आंतर मशागत करणे शक्य होते. तण नियंत्रणाच्या दृष्टीने उगवणपूर्व तणनाशकांचा वापर केल्यास प्रभावी तण नियंत्रण होते. या पद्धतीमध्ये चांगली मशागत होऊन बियाण्यासाठी चांगले वरंबे तयार होतात. हवा खेळती राहून पाणी व हवा यांचे योग्य प्रमाण राखले जाते. पिकाची वाढ जोमदार होते. अधिक पाऊस झाल्यास पाण्याचा योग्य पद्धतीने निचरा होऊन पाणी निघून जाते. पाणी सऱ्यांमध्ये मुरते व मूलस्थानी जलसंवर्धन होऊन पावसाचा दीर्घकालीन खंड पडल्यास जमिनीत ओलावा टिकून राहतो. असे रुंद वरंबा-सरी पद्धतीचे फायदे होत असल्याने, पीक उत्पादनात भरघोस वाढ होते.