तुमसर : बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून लायन्स क्लब तुमसरद्वारा आयोजित प्लाझ्मा व रक्तदान शिबिरात १० दात्यांनी रक्तदान केले, तर १२ कोविड योद्ध्यांनी आपला प्लाझ्मा दान केला.
याप्रसंगी शिबिराचे उद्घाटन लायन्स क्लबचे मल्टिपल कोऑर्डिनेटर ब्लड डोनेशन अधिकारी नवीनभाई पटेल यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाला रिजन चेअरमन सुनील पारधी, झोन चेयरमन प्रदीप पडोळे, अनिल सुरजन, डॉ. मधुकर लांजे, ललित थानथराठे, तीन लायन्स क्लबचे अध्यक्ष, मनोज उखरे, मनीष लालवानी, डॉ. राहुल कनोजे, राजेश पारधी प्रामुख्याने उपस्थित होते. याप्रसंगी प्लाझ्मा दानसंदर्भात सांगताना सुनील पारधी यांनी सांगितले की, ज्या कोणाला कोरोना झाला आहे त्यांनाच प्लाझ्मा दान करता येतो. यामुळे जे कोविड रुग्ण दवाखान्यात भरती असतात त्यांना हा प्लाझ्मा चढवून त्याचे आपण प्राण वाचवू शकतो आणि प्लाझ्मा दान हा दहा दिवसांच्या आत देता येतो. यात शरीराचे कोणतेही नुकसान होत नाही, असे सांगून रक्तदानामुळे जसे आपण दुसऱ्याचे जीव वाचवू शकतो तसेच प्लाझ्मामुळे कोविड रुग्णाला संजीवनी देता येते, असे प्लाझ्मा दानाचे महत्त्व पटवून दिले. शिबिरादरम्यान लायन्स क्लबच्या वतीने जनसामान्यांच्या समस्या सोडवणारे व समाजात जागरूकता निर्माण करण्यासाठी जे प्रसारमाध्यम मोलाची भूमिका बजावतात, अशा तुमसर पत्रकारांचा शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.