साकोली : स्थानीय वैनगंगा शारीरिक शिक्षण महाविद्यालयाच्या प्रांगणात राजीव गांधी महाविद्यालय सडक-अर्जुनी, कटकवार विद्यालय साकोली व वैनगंगा शारीरिक शिक्षण महाविद्यालयातर्फे टोकियो ऑलिम्पिक खेळामध्ये सहभागी भारतीय दलाचे बळ वाढविण्यासाठी व प्रेरणा देण्यासाठी कार्यक्रम आयोजित करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. जितेंद्र कुमार ठाकूर, प्रमुख अतिथी क्रीडा संघटक शाहीद कुरेशी, डॉ. सुनील चतुर्वेदी यांच्या उपस्थितीत मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करण्यात आले.
याप्रसंगी कुरेशी यांनी सांगितले की, जे आतापर्यंत झाले नाही ते आता होणार, जगाला दाखवायचे आहे की, हा भारत आहे. कोरोना प्रादुर्भाव लक्षात घेता एक वर्षानंतर ऑलिम्पिक स्पर्धेला टोकियो येथे सुरुवात होत आहे. त्यात सहभागी झालेल्या खेळाडूंचा आत्मविश्वास वाढविण्यासाठी हा देश तुमच्यासोबत आहे. तुम्ही यशस्वी व्हा अशा शुभेच्छा दिल्या. डॉ. ठाकूर यांनी सांगितले की, कोरोना काळातही आमच्या खेळाडूंचा आत्मविश्वास कमी झालेला नाही. उत्कृष्ट शारीरिक, भावनिक आणि प्रतिस्पर्धी तयारीत कुठलीही कसर शिल्लक राहिलेली नाही. भारतीय क्रीडा क्षेत्रासाठी हा मैलाचा दगड ठरू शकेल. याच्या सकारात्मक लाभ होईल, अशा शुभेच्छा त्यांनी दिल्या.
डॉ. चतुर्वेदी यांनी भारतीय दलाला ऑलिम्पिक खेळासाठी शुभेच्छा देत चांगली कामगिरी करण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अनिल गायकवाड, राजकुमार भगत, पल्लवी देशमुख, संजय पाखमोडे, अरुण उपरीकर, विनोद गणवीर, गिरधर हटवार, मिथुन कुमार, अशोक कुमार, पुखराज लांजेवार, सादिक सय्यद यांनी अथक परिश्रम केले. कार्यक्रमाचे संचालन डॉ. निखाडे यांनी, तर आभार देवेंद्र इसापुरे यांनी मानले.