तथागत मेश्रामलोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : ग्रामीण भागातील अर्थव्यवस्था ही पदराच्या गाठीत गुंडाळून असते. पदराला जेवढ्या गाठी तेवढी अर्थव्यवस्था मजबूत अशी हकीकत आहे. संचारबंदीच्या काळात पदराच्या गाठी सोडाव्या लागत असून हातालाही काम नाही. अनेकांची आर्थिक घडी विस्कटली असून पदरातील अर्थव्यवस्था कोलमडल्याने कोरोनाशी दोन हात करताना ग्रामीण मजूर हातघाईस आले आहे. अनेकांवर उपासमारीची वेळ येवून ठेपली आहे.ग्रामीण व शहरी भागात मजूरांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. हातावर आणून पानावर खाणारे अनेक कुटूंब आहे. मिळेल ते काम व मिळेल तेवढ्या दामात जीवनाचा गाढा ओढावा लागतो. रोजंदारीवर काम करणारे असो की महिन्यावरीवर काम करणारे तोकड्या मजूरीत वाताहत होत असते. परंतु दिवसभर राबराबराबून सायंकाळी दोन घास पोटात पडतात. यातूनही अनेक महिला थोडी आर्थिक बचत करतात. ग्रामीण भागातील महिला आपल्या जवळ असलेला पैसा इतरत्र न ठेवता पदरात बाधून ठेवतात. अनेक महिलांच्या पदराला अशा गाठी दिसतात. वेळप्रसंगी हीच बचत कामात येते. मात्र आता कोरोनाच्या संकटाने या गाठी सोडाव्या लागत आहे. या गाठीतील पैसेही ओसरले आहे.हाताला काम नाही, आणि शासकीय अन्नधान्य मिळत असले तरी इतर साहित्यांसाठी हातात पैसेच नाही. घर कसे चालवावे अशा प्रश्न गावागावातील गृहलक्ष्मींना पडला आहे. गावागावातील मजूर चिंतेत सापडले आहे.मजूरांना भविष्याची चिंतासंकटाशी लढताना आर्थिक सुबत्ता महत्वाची असते. शासन स्तरावर मदतीचा ओघ सुरु आहे. सामाजीक संघटना राजकीय पुढारी कार्यकर्ते मदतीचा सपाटा सुरु आहे. परंतू तुटपूंज्या कमाईत घर खर्च करताना अनेकांच्या नाकीनऊ येत आहे. भविष्यातील संकटाचा सामना कशा करावा अशा प्रश्न त्यांना पडला आहे. त्यांना पदराला बांधलेल्या गाठीतूनच खर्च करावा लागत आहे. या पदराच्या गाठी पुन्हा बांधण्यासाठी किती दिवस लागतील हा प्रश्नच आहे.
पदरच्या गाठी रिकाम्या आणि हातालाही काम नाही; ग्रामीण अर्थव्यवस्था ठप्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2020 3:10 PM
संचारबंदीच्या काळात पदराच्या गाठी सोडाव्या लागत असून हातालाही काम नाही. अनेकांची आर्थिक घडी विस्कटली असून पदरातील अर्थव्यवस्था कोलमडल्याने कोरोनाशी दोन हात करताना ग्रामीण मजूर हातघाईस आले आहे.
ठळक मुद्देकोरोनाशी दोन हात करताना मजुरांची उपासमार