पवनी : तालुक्यात रेतीघाटावरून रेतीचे मोठ्या प्रमाणात अवैध उत्खनन सुरु आहे. त्यापैकीच एक असलेल्या पवनी घाटावरून पोकलँडद्वारे रेतीचे अवैध उत्खनन करीत असताना प्रभारी तहसीलदार पवनीत कौर यांनी पोकलँडसह दोन ट्रकवर जप्तीची कारवाई केली. सोमवारला दुपारी वैनगंगा पुलाचे बाजूला पवनी रेती घाटामधून पोकलँडद्वारे रेतीचा उपसा सुरु असल्याची माहिती प्राप्त झाली. त्यानुसार त्यांनी रेती घाटावर भेट दिली असता महसूल विभागाने मोजून दिलेल्या जागेवरून रेतीचा उपसा न करता अन्य ठिकाणी उपसा सुरु असल्याचे लक्षात आले. कोणत्याही घाटावरून शासनाने नियमानुसार पोकलँड, जेसीपी किंवा अन्य यंत्राद्वारे रेतीचा उपसा करता येत नाही. असे असताना रेतीचा उपसा पोकलँडद्वारे ते सुद्धा मोजून दिलेल्या जागेव्यतिरिक्त असल्याने जप्तीची कारवाई केल्याचे सांगितले. पवनी घाटासाठी गट क्र. ५२९, ५९३, ५९४ चे पूर्वेस रेती उपसा करण्याची परवानगी देण्यात आलेली आहे. मात्र पोकलँडद्वारे उपसा सुरु होता अशी जागा गट क्र. ८० (१), ८१, ८२ व ८५ चे पूर्वेस आहे. त्यामुळे या जागेत उपसा सुरु असल्याने पोकलँड ई वाय २०० एलएल एमएसीएएसई क्र. २०० - ९१२७ व ट्रक क्र. एम.एच. ३२ बी ९१०६ व एम.एच. ३२ क्यु ५०८ जप्त करण्यात आले. जप्तीच्या कारवाईसाठी प्रभारी तहसीलदार पवनीत कौर, नायब तहसीलदार महेंद्र वाकलेकर, तलाठी एम.डी. इप्पर व कोतवाल विष्णू तुळसकर तथा पोलीस कर्मचारी उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)
पोकलँडसह ट्रक जप्त
By admin | Published: March 22, 2016 12:44 AM