संजय साठवणे। लोकमत न्यूज नेटवर्कसाकोली : तालुक्यात सध्या अवैध धंदे व दारूविक्रीचीच सर्वत्र चर्चा आहे. एवढेच नव्हे तर हे अवैध धंदे बंद व्हावे, यासाठी महिलांना रस्त्यावर उतरावे लागत आहे. जनतेच्या सर्वांगिण सुरक्षेसाठी शासनाने पोलीस प्रशासनाची नियुक्ती केली असली तरी पोलीस केवळ बघ्याची भूमिका घेत आहे. याचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे. एकंदरीत या अवैध धंद्यांना पोलीसच जबाबदार आहेत, यात शंका नाही.साकोली तालुक्यात अवैध दारूविक्री, जुगार व सट्टा यासारखे अवैध धंदे राजरोसपणे पोलिसांमुळे सुरू आहेत. या अवैधधंद्यांचा महिला, पुरूष व तरूण पिढीला कमालिचा त्रास सहन करावा लागत आहे. हे अवैध धंदे कायमचे बंद व्हावे, यासाठी शिवकुमार गणवीर, कैलाश गेडाम यांच्या नेतृत्वात मागील एक वर्षापासून प्रयत्न सुरू आहेत. एकोडी बांपेवाडासह अनेक गावात अवैध धंदे बंद व्हावे, यासाठी निवेदन देणे, मोर्चा काढले. पोलिसांच्या आशीर्वादामुळे हे धंदे बंद होण्याऐवजी दिवसेंदिवस वाढत आहे. यावर तोडगा निघत नाही. गणवीर व गेडाम यांच्या नेतृत्वात तालुक्यातील महिलांनी मोर्चा काढला. या मोर्चामुळे प्रशासनातर्फे काही अवैध व्यावसायिकांवर थातूरमातूर कारवाई करण्यात आली. ही कारवाई आता केवळ आठ दिवस सुरू राहणार त्यानंतर परिस्थिती जैसे थे होणार आहे.सक्षम तहसीलदारसाकोलीत दोन महिन्यापूर्वी अरविंद हिंगे हे तहसीलदार म्हणून रूजू झाले. त्यांनी अवैध धंद्यांवर आळा बसविण्यात यश आले तरी साकोली तालुक्यातील अनेक प्रश्न सोडविण्यासाठी असमर्थ ठरले आहेत. सध्या गडकुंभली (रोड) साकोली येथे वाईनशॉपसमोर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण वाढले आहे. या अतिक्रमणामुळे रस्त्यावर गर्दी होत असते. या गर्दीमुळे जाणाऱ्या येणाऱ्यांना कमालिचा त्रास सहन करावा लागत आहे. यासंदर्भात तक्रारी झाल्या. मात्र पोलीस विभाग महसूलकडे व महसूल विभाग पोलीस प्रशासनकडे बोट दाखवून जबाबदारी झटकत आहे. रस्त्यावरून सायंकाळी फिरायला जाणाऱ्या वयोवृद्धांनीही आता या रस्त्याकडे पाठ फिरविली. त्यामुळे नावारूपाला आलेला गडकुंभली रोड आता नावापुरताच उरला आहे. त्यामुळे तहसीलदार हिंगे यावर काही उपाययोजना करतील अशी अपेक्षा आहे.
याला पोलीसच जबाबदार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2017 12:47 AM