*पोलीस अधीक्षक वसंत जाधव
* आंधळगाव पोलीस स्टेशन येथे ठाणेदार कक्षाचे उद्घाटन
१७ लोक ०७ के
भंडारा : देशाच्या जडणघडणीत पोलीस आणि नागरिक यांचे संबंध महत्त्वाचे आहेत. नागरिकांनी आनंदी जीवन जगावे, त्यांच्यावर कोणत्याही प्रकारचा अन्याय होऊ नये, झालाच तर त्याला कायद्याने वाचा फोडली गेली पाहिजे. नागरिकांचे संरक्षण करणे, यासाठी पोलीस आपले कर्तव्य जीवाची पर्वा न करता कार्यतत्परपणे बजावत असतात. त्याप्रमाणे पोलिसांबाबत नागरिकांची सुद्धा कर्तव्ये आहेत, गुन्ह्याचा तपास करण्यासाठी पोलिसांना नागरिकांची मदत घ्यावी लागते. अशावेळी पोलीस आपले मित्र आहेत, ही सद्भावना मनी बाळगून पोलिसांना मदत करण्याचे आवाहन भंडारा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक वसंत जाधव यांनी केले.
ते मोहाडी तालुक्यातील आंधळगाव पोलीस स्टेशनमध्ये लोकसहभागातून नव्याने तयार करण्यात आलेल्या ठाणेदार कक्षाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी संतोषसिंग बिसेन उपविभागीय पोलीस अधिकारी सपोनि सुरेश मटटामी, ठाणेदार, पोलीस स्टेशन आंधळगाव उपस्थित होते. पोलीस अधीक्षक जाधव यांनी आंधळगाव पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या ज्या नागरिकांनी ठाणेदार व रायटर कक्ष उभारण्यासाठी सढळ हाताने आर्थिक मदत केली, त्या दानदात्याचे पोलीस विभागातर्फे आभार मानले. कार्यक्रमाप्रसंगी वास्तू उभी करण्याकरिता दानदाते, पोलीस अंमलदार, होमगार्ड सैनिक, पोलीस पाटील यांना सन्मानपत्र देऊन गौरवण्यात आले. कार्यक्रमासाठी पोलीस कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.