चंदन मोटघरे लाखनीस्थानिक पोलीस ठाणेसमोर पोलीस कर्मचाऱ्यांची वसाहत आहे. या वसाहतीतील पाच सदनिका व एक पोलीस निरीक्षकांचे निवासस्थान भग्नावस्थेत आहे. गत १० वर्षांपासून वसाहतीत एकही पोलिसांचे कुटुंब वास्तव्याला नाही. शासनाने दुर्लक्ष केल्यामुळे पोलिसांना खासगी घरात राहावे लागते .तर काही पोलीस 'अपडाऊन' करत असतात. सार्वजनिक बांधकाम विभागाने मागील वर्षी दोन सदनिका दुरूस्त केल्यात. परंतु त्याचा उपयोग झाला नसल्याने लाखो रूपयांचा चुराडा झाला आहे. लाखनी येथे १४ फेब्रुवारी १९७० ला पोलीस ठाण्याची निर्मिती करण्यात आली. तत्पूर्वी लाखनी येथे पोलीस चौकी होती. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वर बसस्थानकाजवळ गावाच्या बाहेर १९८३ ला नवीन इमारत तयार करण्यात आली. पोलीस निरीक्षक व पोलिसांसाठी १९८७ मध्ये सदनिका तयार करण्यात आल्यात. प्रारंभी पुर्ण सदनिकेत पोलिसांचे कुटूंब वास्तव्य करायचे व पोलीस सदैव जनतेच्या सेवेत तत्पर राहत होते.मागील दहा वर्षाच्या कालावधीत वसाहतीकडे दुर्लक्ष झाले आहे. भिंतीला तडे गेले आहे. छत तुटले आहेत. भिंतीवर वृक्ष वेलींनी आक्रमण केली असल्याने सदनिका भग्नावस्थेत गेल्या आहेत. दोन सदनिकांची दुरूस्ती करण्यात आली. परंतु परिसरात वाढलेले गवत, कचरा, अनावश्यक वृक्ष, स्वच्छतेचा अभाव यामुळे वसाहतीला वाईट दिवस आले. याठिकाणी मुलांना खेळण्याची साधने आहेत. विहीर आहे. सर्वांची अवस्था बघण्यासारखी नाही.राज्य शासनाने पोलिसासाठी वसाहत व निवासस्थान तयार करून देण्याच्या दृष्टीने पाऊल उचलली आहेत. लाखनीत २८ वर्षापुर्वी तयार झालेल्या सदनिका पोलिसांना वास्तव्य करण्यासारख्या राहिल्या नाहीत. यामुळे जुन्या इमारती पाडून नवीन इमारत तयार करण्याची गरज आहे. मागील वर्षी डीपीडीसीमधून सदनिका दुरूस्तीसाठी ३० लाख रूपये मंजूर झाले होते. त्या निधीतून दोन सदनिका थातूरमातूर दुरूस्त्या करण्यात आल्यात. रंगरंगोटी करण्यात आली. त्याठिकाणी पोलिसांचे एकही कुटूंब वास्तव्याला नाही.लाखनी पोलीस स्टेशनमध्ये पोलीस निरीक्षक, सहा पोलीस उपनिरीक्षक व ६५ पोलिसांची पद मंजुर आहेत. ६१ गाव व १ रिठी गावातील ९३ हजार लोकांच्या संरक्षणाची जबाबदारी लाखनी पोलिसांची आहे. लाखनी पोलीस स्टेशनअंतर्गत लाखनी, मुरमाडी, सावरी, पोहरा, गुंथारा, पिंपळगाव सडक, ही संवेदनशिल गाव येतात. तर नक्षलग्रस्त संवेदनशिल गावामध्ये खुर्शीपार, उसगाव, चिखलाबोडी, सोनेखारी ही गावे येतात. जनतेच्या सेवेसाठी कोणतीही आपातग्रस्त परिस्थिती उद्भवली तर पोलिसांची गरज भासते. अशावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी साकोली यांच्या नियंत्रणाखाली येणारे १८ कमांडोचे नक्षलविरोधी पथकाची मदत घ्यावी लागते.लाखनी पोलीस निवासस्थानांचा प्रश्न महत्वाचा असून याबाबत पोलीस निरीक्षकांनी पोलीस सदनिकेच्या दुरूस्तीबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाशी संपर्क केला आहे. त्याकडे वारंवार दुर्लक्ष झाले असल्याने ज्या इमारती दुरूस्ती करून वापरता येणे शक्य होत्या त्यांची आता दुर्दशा झाली आहे.
पोलीस वसाहतीची भग्नावस्था
By admin | Published: December 20, 2015 12:34 AM