भंडारा/लाखनी : लाखनी तालुक्यातील पोहरा येथील बँक किंंवा एटीएम मशिन फोडण्याच्या तयारीत असलेल्या दोघांना अटक केली. या दोघांची १० एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.राहुल टोलीराम बोंदरे (२४) व रवि रामप्रसाद दुबे (३०) रा. बेला ता. भंडारा असे अटक करण्यात आलेल्या आरोपींचे नाव आहे. लाखनी तालुक्यातील पोहरा येथे बँक आॅफ इंडिया व त्यांचे एटीएम मशिन आहे. लाखनी पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी गुरूवारी मध्यरात्री पोहरा येथे गस्तीवर होते. यावेळी त्यांनी अंगणवाडी इमारतीजवळील गल्लीतून दोन संशयीतांना ताब्यात घेवून चौकशी केली. यात त्यांच्याजवळून धारदार शस्त्रासह दरोडा टाकण्यासंबधी गॅस कटरसह अन्य साहित्य आढळून आले. त्यांच्याविरोधात लाखनी पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे. या दोघांनाही लाखनी येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयात प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी पी. एन. आवळे यांच्या समक्ष हजर केले. न्यायाधीशांनी दोघांना १० एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. यात दोघांनी जिल्हासह अन्य ठिकाणी चोरी केल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. त्या दृष्टीने पोलीसांनी त्यांची पोलीस कोठडी मागितली आहे. प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक चंद्रशेखर चकाटे यांच्या मार्गदर्शनात सुरु आहे. (शहर प्रतिनिधी)
‘त्या’ आरोपींना सोमवारपर्यंत पोलीस कोठडी
By admin | Published: April 10, 2017 12:36 AM