शासन परिपत्रक : शिक्षकांमध्ये उत्साहाचे वातावरणभंडारा : घडलेल्या गुन्ह्यात पोलीस प्रशासन शिक्षकांना पंच म्हणून बोलवित होते. मात्र शिक्षकांना यानंतर कुठल्याही गुन्ह्याच्या बाबतीत पंच म्हणून बोलवू नये असे अध्यादेश शासनाने निर्गमित केले आहे. स्थानिक स्वराज संस्था अंतर्गत शिक्षक हे निमशासकीय कर्मचाऱ्यांमध्ये मोडतात तर खासगी शाळांमध्ये शिक्षक हे त्या त्या व्यवस्थापनांतर्गत खाजगी कर्मचारी म्हणून गणण्यात येतात. असे असतांनाही ग्रामीण किंवा शहरी भागात एखादा फौजदारी स्वरुपाचा गुन्हा झाल्यास पंचनाम्यासाठी साक्षीदार म्हणून शिक्षकांऐवजी शासकीय कर्मचाऱ्यांना घ्यावे असे या अध्यादेशात स्पष्ट करण्यात आले आहे. मुंबई येथे झालेल्या महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या पदाधिकाऱ्यांनी फौजदारी स्वरुपाच्या गुन्ह्यात शिक्षकांची साक्ष घेवून त्यांना वेठीस धरण्याचा प्रकार पोलीस प्रशासनाकडून अवलंबिण्यात येत असल्याने शासनाकडे रोष व्यक्त केला होता. फौजदारी स्वरुपाच्या गुन्ह्यातून शिक्षकांची सुटका करावी अशी मागणी या संघाच्या पदाधिकाऱ्यांनी केली होती. परंतु शासनाने याबाबत निर्णय नव्हता. तर शिक्षण विभागाने शिक्षकांनी फौजदारी गुन्ह्यात पंच म्हणून उपस्थित राहावे की नाही याबाबत स्पष्ट भुमिका घेतली होती. त्यामुळे शिक्षकांना पंच म्हणून उपस्थित राहण्याचा तगादा पोलीस प्रशासनाने लावला होता. याबाबत शिक्षकांमध्ये असंतोष होता. याबाबत गृह विभागाचे कार्यासन अधिकारी अ.व्ही. जोशी यांनी अध्यादेश काढला असून फौजदारी स्वरुपाच्या गुन्ह्यात शिक्षकांना पंच म्हणून बोलवू नये असे स्पष्ट निर्देश दिले आहे. यामुळे शिक्षकांच्या चेहऱ्यावर आता समाधान झळकु लागले आहे. (शहर प्रतिनिधी)विद्यार्थी घडविण्याची जबाबदारी शिक्षकांवर आहे. ती योग्य रित्या पार पाडण्यासाठी शिक्षक प्रतिबध्द आहे. शासनाने शिक्षणाशिवाय अन्य कुठल्याही कार्याची जबाबदारी शिक्षकांवर लादू नये. गृह विभागाच्या या अध्यादेशामुळे शिक्षकांना समाधान मिळाले आहे.- मुबारक सय्यदजिल्हाध्यक्ष, महा. राज्य प्राथ. शिक्षक संघ, भंडारा
पोलीस पंचनाम्यातून शिक्षकांना वगळले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 02, 2016 12:37 AM