इंद्रपाल कटकवार
भंडारा : कर्जबाजारीपणातून सावकाराला धाक दाखवण्यासाठी चक्क न्यायालयाच्या पोलीस गार्ड रुममधून पोलीस शिपायाने रिव्हॉल्व्हरसह ३५ काडतुसे चोरल्याची घटना उघडकीला आली. या घटनेने खळबळ माजली असून पोलिसांनी जलदगतीने चक्र फिरवून याप्रकरणी रिव्हॉल्व्हर व काडतुसे चोरून नेलेल्या पोलीस शिपायाला अटक केली आहे. निलेश खडसे असे अटक केलेल्या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव असून त्याच्या ताब्यातून रिव्हॉल्व्हर व ३५ काडतुसे जप्त करण्यात आली आहेत.
माहितीनुसार, पोलीस मुख्यालयात राखीव पोलीस निरीक्षक चौधरी हे २९ ऑक्टोबरला नेहमीप्रमाणे रात्री दरम्यान शासकीय कार्यालयातील पोलीस गार्ड तपासणीवर होते. याचवेळी त्यांना जिल्हा व सत्र न्यायालयातील पोलीस गार्ड रूममध्ये कर्तव्यावर असलेले सहायक फौजदार सुनील सयाम यांचा फोन आला. त्यांनी मुद्देमाल गार्डमधील एक रिव्हॉल्व्हर व नऊ एमएमचे ३५ काडतुसे नसल्याची माहिती दिली.
याबाबत पोलीस निरीक्षक चौधरी यांनी तत्काळ वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना माहिती दिली व घटनास्थळी रवाना झाले. रात्रीलाच न्यायालयातील गार्ड कक्षाची तपासणी केली असता सहायक फौजदार सुनील सयाम यांच्या नावे ताब्यात मिळालेली एक ०.३८ ची एक रिव्हॉल्व्हर व सहायक फौजदार चोले यांच्या ताब्यातील ३५ काडतुसे चोरीला गेल्याची बाब उघडकीला आली. गार्डमधील उपस्थित अमलदारांना विचारपूस करण्यात आली. घटनेची खात्री झाल्याने राखीव पोलीस निरीक्षक चौधरी यांनी भंडारा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. तपास पोलीस उपनिरीक्षक निखिल राहाटे यांच्याकडे देण्यात आले.
महिला पोलीस शिपायाचे बयान ठरले महत्वपूर्ण
घटनेबाबत पोलीस गार्ड कक्षामधील सर्व अमलदार यांना विचारपूस करण्यात आली. घटनेचा पंचनामा सुरू असताना कर्तव्यावर असलेल्या महिला पोलीस शिपाई चव्हाण यांनाही विचारपूस करण्यात आली. चव्हाण यांच्या बयानानुसार, २९ ऑक्टोबरला सकाळी ९ वाजताच्या सुमारास पोलीस शिपाई खडसे यांची ड्युटी नसतानाही ते एक बॅग घेऊन न्यायालयातील गार्ड कक्षात आले होते. एकटेच कक्षात पाच मिनिटे थांबून शस्त्रांची तपासणी केली व बॅगसह तिथून निघून गेल्याचे सांगितले. पोलीस शिपाई चव्हाण यांचे बयाण तपासाला गती देणारे ठरले.
बयाणावर सीसीटीव्ही फुटेजचा शिक्का
महिला पोलीस शिपाई चव्हाण यांच्या बयानानंतर जिल्हा न्यायालयात लागलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी करण्यात आली. यात सीसीटीव्ही फुटेज चेक केल्यानंतर गार्ड पहाऱ्यावरील अंमलदार पोलीस शिपाई निलेश खडसे हा आपल्यासोबत संशयास्पद एक बॅग घेऊन जाताना दिसून आले. तसेच त्याच्या एकंदरीत हालचालीवरून त्याच्यावर संशय बळवल्याने त्यांना विश्वासात घेऊन विचारपूस करण्यात आली.
सावकाराला होते धमकावायचे
पोलीस शिपाई निलेश खडसे याच्या कबुली जबाबानंतर सगळी घटना उघडकिला आली. कर्जबाजारीपणामुळे त्यांना पैशासाठी सततचा तगादा लावला जात होता. परिणामी सावकाराला धडा शिकवण्यासाठी आपण न्यायालयातील पोलीस गार्ड कक्षामधून रिव्हॉल्व्हर व ३५ काडतुसांची चोरी केल्याचे सांगितले. चोरी केलेले साहित्य सिव्हिल लाईन परिसरातील एका कक्षातून लपवून ठेवल्याचेही सांगितले. त्यानुसार रिव्हॉल्व्हर व ३५ काडतुसे जप्त करण्यात आली. न्यायालयाच्या पोलीस गार्ड कक्षातील रिवाल्वरसह ३५ काडतुसे चोरी केल्याप्रकरणी पोलीस शिपायाला अटक करण्यात आली आहे. त्याच्या ताब्यातून मुद्देमालही जप्त करण्यात आला आहे. पुढील तपास सुरू आहे.
- लोहित मतानी, जिल्हा पोलीस अधीक्षक, भंडारा