आत्महत्येचे कारण अस्पष्ट : सातोना शेतशिवारात आढळला मृतदेहभंडारा : मागील काही दिवसांपासून नैराश्यात असलेल्या एका वाहतूक पोलीस शिपायाने विषप्राशन करून आत्महत्या केली. बुधवारला सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास त्याचा मृतदेह सातोना मार्गावरील नहराच्या काठावर असलेल्या एका शेतात आढळून आला. वालदे यांच्या आत्महत्येच्या घटनेमुळे पोलीस विभागात खळबळ उडाली आहे.रतन वालदे (५३) रा.खात रोड भंडारा असे मृत पोलीस शिपायाचे नाव आहे. भंडारा शहर वाहतूक शाखेत कार्यरत रतन वालदे हे खात रोड मार्गावर भाड्याने राहतात. आज बुधवारला ते ड्युटीवर न जाता सातोना मार्गावरील नहराच्या दिशेने एका शेतात जावून विषप्राशन केले. त्यानंतर त्यांचा मृत्यू झाला असावा. मृतदेह खूप वेळेपर्यंत उन्हात पडून असल्यामुळे कडक झाल्याचे प्रत्यक्षदर्शीनी सांगितले. सायंकाळी या मार्गाने येणाऱ्या लोकांना मृतदेह दिसल्यानंतर ही वार्ता गावात पसरली. त्यानंतर घटनास्थळावर नागरिकांची गर्दी झाली. या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच शहर पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यावेळी मृतक वाहतूक शाखेतील पोलीस शिपाई रतन वालदे असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. मृतदेहाशेजारी दुचाकी वाहन व विषाची शिशी असल्याचे दिसून आले. वालदे यांच्या आत्महत्येमागील कारण कळू शकले नाही. घटनास्थळाची वरिष्ठ पोलिसांनी पाहणी केली असून पंचनाम्यानंतर शवविच्छेदनासाठी मृतदेह जिल्हा रूग्णालयात हलविण्यात आले.यासंदर्भात पोलीस अधीक्षक विनीता साहू यांना विचारले असता, पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला आहे. वालदे यांच्या आत्महत्येमागील कारण सद्यस्थितीत स्पष्ट झाले नसून तपासाअंतीच आत्महत्येचे कारण स्पष्ट होईल, असे सांगितले. परंतु यासंदर्भात शहर पोलीस ठाण्यात आणि पोलीस निरीक्षक, तपास अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही. (जिल्हा प्रतिनिधी)
पोलीस शिपायाची आत्महत्या
By admin | Published: April 06, 2017 12:17 AM