भंडारा : श्रीराम नवमीनिमित्त भंडारा शहरातून निघालेल्या शोभायात्रेत एक आठ वर्षीय मुलगी वडिलांपासून गर्दीमुळे दूर झाली. अशातच पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांमुळे चिमुकलीला तिचे बाबा परत मिळाले.
ही घटना रविवारी सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास शहरातील मुख्य मार्गावर घडली. लावण्या चंद्रशेखर बुरडे, रा. राजगोपालाचारी वाॅर्ड, भंडारा असे चिमुकलीचे नाव आहे. लावण्यासाठी पोलीस काल बजरंगी भाईजान ठरल्याचीच प्रचिती आली.
गांधी चौकात मिरवणूक आली असताना लावण्या ही वडील व आजीसोबत शोभायात्रा पहायला आली. पोहा गल्लीजवळ लागलेल्या एका काउंटरवर ताक घेण्यासाठी गेली असता तिचा तिच्या वडिलांशी संपर्क तुटला. पप्पाला शोधत असताना ती रडायला लागली. याचवेळी मिरवणुकीच्या ओघात ती तुकडोजी पुतळ्यापर्यंत आली. यावेळी तिने तिथे उपस्थित एका महिला पोलीस कर्मचाऱ्याचा हात पकडून पप्पा गर्दीत दिसत नसल्याचे सांगितले. महिला पोलीस कर्मचाऱ्याने याची माहिती पोलीस उपनिरीक्षक अरविंदकुमार जगने यांना दिली.
जगने यांनी तिथे येत मुलीला शांत करीत तिच्याकडून मोबाईल नंबर घेतला. तसेच तिच्या वडिलांशी संपर्क करीत तिथेच लावण्याला पोहचवून दिले. अर्धा तासपर्यंत लावण्याच्या वडिलांचाही जीवात जीव नव्हता. मुलीला बघताच चंद्रशेखर बुरडे यांचा जीव भांड्यात पडला. चिमुकलीला कवेत घेऊन पोलिसांचे आभार मानले. तुम्ही नसते तर कदाचित एखादी अप्रिय घटना घडली असती. परंतु लावण्याही सुखरूप आपल्या वडिलांपर्यंत पोहचली.
पोलिसांचे आभार
महिला पोलीस कर्मचारी व पीएसआय अरविंदकुमार जगने यांच्यामुळेच माझी छकुली मला परत मिळाली. पोलिसांनी योग्य वेळी माझ्या चिमुकलीला संरक्षण दिले. पोलिसांचे मी आभार मानतो.
-चंद्रशेखर बुरडे, भंडारा