पालांदूर : पोलीसपाटील हे समाजातील सन्माननीय स्थान असून, पोलीस व जनतेतील महत्त्वाचा दुवा आहे. पोलीस पाटलाशिवाय पोलीस विभाग अपुरा आहे. पोलीसपाटील हा पोलीस व जनतेमधील दुवा आहे. गावात शांततापूर्ण वातावरण टिकविण्याकरिता पोलीस पाटलांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. कोरोना काळातही पोलीस पाटलांनी सामाजिक जबाबदारीचे भान ठेवत शासन व प्रशासनाला प्रसंशनीय सहकार्य केले, असे उद्गार ठाणेदार मनोज सिडाम यांनी काढले.
पालांदूर पोलीस ठाण्यात आयोजित कार्यक्रमात अध्यक्षपदावरून ते बोलत होते. यावेळी मान्यवर मंडळीत प्रमुख उपस्थितीत ज्येष्ठ पोलीसपाटील शेषराव शिवणकर बेलाटी, महिला पोलीसपाटील विना सेलोकर जेवणाळा, गुणवंत बोरकर कवळशी, पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रकाश तलमले, चाचेरे, पोलीस शिपाई नावेद पठाण, स्थानिक वार्ताहर मुखरू बागडे, लोकमत, पोलीसपाटील रमेश कापसे आदी उपस्थित होते.
यावेळी ज्येष्ठ पोलीसपाटील शेषराव शिवणकर यांनी सहकारी यांना कर्तव्याची सकारात्मक बाजू सविस्तरपणे समजून सांगितली. कर्तव्य वेळी प्रत्येक पोलीस पाटलांनी प्रामाणिकता जपली पाहिजे. गावात स्वतःची प्रतिमा स्वच्छ ठेवावी. राजकारणविरहित समाजसेवा व आपले पद कायम ठेवावे, असे मार्मिक मार्गदर्शन पोलीसपाटील संघटनेतून इतर मान्यवर पोलीसपाटलांनी केले.
उपविभागीय पोलीस अधिकारी डिसले यांच्या मार्गदर्शनातून एक जानेवारी हा पोलीसपाटील दिवस म्हणून सन्मानाने पार पडला. सूत्रसंचालन पोलीसपाटील गुणीराम बोरकर यांनी केले. सुनील लुटे यांनी प्रस्तावना केली. बच्चू नंदागवळी यांनी आभार मानले. कार्यक्रमाकरिता पोलीसपाटील संघटनेतील सर्व पोलीसपाटलांनी सहर्ष सहकार्य करीत कार्यक्रमाला हजेरी लावली.
फोटो