गोपालकृष्ण मांडवकर ,भंडारा : घरफोडीच्या गुन्ह्यात पोलिसांना हवा असलेला मुख्य आरोपी गावात आल्याचे पाहून पोलिसांनी धाव घेतली. मात्र आरोपी शेतशिवारात धुऱ्याआड लपून बसला. आरोपी पुढे आणि पोलिस मागे असा सिनेस्टाईल पाठलाग करून अखेर पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवळल्या आणि न्यायालयासमोर उभे केले.
जगदीश बाबुराव रणदिवे (३०, मांगली (बांध), ता. लाखनी) असे या आरोपीचे नाव आहे. ही घटना शनिवारी सकाळी मांगली (बांध) शेतशिवारात घडली. जगदिश गावात आल्याची गुप्त माहिती पोलीस नायक नाविद पठाण यांना मिळाली होती. त्याननी वरिष्ठांना माहिती देऊन सहकाऱ्यांसह गाव गाठले. मात्र पोलिस गावात आल्याचे पाहून जगदिशने शेताकडे धाव घेतली. एका खोलगट जागेत शेतातील धुऱ्याआड तो लपून बसला. पोलिस नायक पठाण यांना तो दिसताच त्यांनी धाव घेतली. मात्र तो पळायला लागला. अखेर तो पोलिसांच्या हाती लागलाच.
दुपट्ट्याने गळा आवळण्याचा प्रयत्न :
पोलिसांच्या हाताता लागल्याचे पाहून त्याने स्वत:च्या हाताने आपल्याकडील दुपट्ट्याने स्वताचा गळा आवळण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी तो हाणून पाडला. पाठीमागून काही अंतरावर त्याला पकडले. मात्र त्याच्याकडे असलेल्या दुपट्ट्याने तो स्वतःचा गळा आवळण्याचा प्रयत्न करीत होता. पोलिसांनी त्याचा हा प्रयत्न हाणून पाडला. सामाजिक कार्यकर्ते बंडू उर्फ टोलीराम पुस्तोडे यांच्या सहकार्याने त्याला पकडून पोलिस ठाण्यात आणले आणि न्यायालयासमोर उभे केले.
अशी घडली घटना :
बुधवारच्या रात्री मांगली (बांध) येथील अंजू बांडेबुचे यांच्या घरी १० ग्राम सोने व पाच हजार रुपयाची चोरी झाली होती. पालांदूर पोलिसांना चौकशीअंती दुसऱ्याच दिवशी ओमप्रकाश मडावी हा एक आरोपी गवसला. तर दुसरा संशयित आरोपी जगदीश रणदिवे फरार झाला होता. ओमप्रकाशकडून १० ग्रॅम सोने हस्तगत करण्यात आले. मात्र जगदिश ५ हजार रुपये घेऊन फरार झाला होता. पालांदूर पोलिस त्याच्या मागावर होतेच. गावचे सामाजिक कार्यकर्ते बंडू उर्फ टोलीराम पुस्तोडे यांना जगदिश गावात दिसताच त्यांनी पोलिसांना कळविले आणि तो पकडला गेला.