भंडारा : उपविभागीय अधिकाऱ्यांवर हल्ला करणाऱ्या रेती तस्कारांना पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांची चक्क रेती तस्कारांसोबत सामिष पार्टी रंगलाच्या व्हिडीओ व्हायरल होत आहे. तुमसर ठाण्यात असताना अनेक आरोपींची नावे उडविली, ही तर किरकोळ बाब आहे, असे, पवनी पोलीस ठाण्यात कार्यरत एक हवालदार रेती तस्करांना सांगताना दिसतो. ही पार्टी उमरेड जवळी एका ढाब्यावर बुधवारी दुपारनंतर झाल्याची माहिती आहे.
भंडाराचे उपविभागीय अधिकारी रवींद्र राठोड यांच्यावर बुधवारी पहाटे ३.३० वाजता १५ ते २० रेती तस्कारांनी हल्ला केला होता. यामुळे सर्वत्र एकच खळबळ उडाली. पवनी पोलिसांनी आरोपींच्या शोधासाठी पथक रवाना केले. मात्र त्यातील एक पथक चक्क रेती तस्कारांसोबत सामिष पार्टी करीत असल्याचा व्हिडीओ आता व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत एका ढाब्यावर पार्टी सुरू असून पोलीस आपल्या कर्तृत्वाचा पाढा तस्कांरासमोर वाचत आहे.
आपण कशी मदत करतो हे तुम्हाल तर माहितच आहे. तुमसरमध्ये आरोपींची नावे उडवून टाकली होती. हे तर काहीच नाही, किरकोळ बाब आहे, असे सांगत थेट आयजींचे नाव घेतो. दिलीप घावडे असे पोलिसाचे नाव असून ते सहा महिन्यापूर्वी तुमसरवरून पवनी येथे बदलून आले होते. सध्या ते वाहतूक शाखेत कार्यरत आहे. या पर्टीत किशोर पंचभाई यांच्यासह एसडीओ हल्ला प्रकरणातील आरोपी राजू मेंगरे दिसत आहे. तर कोचे, लांबट हे पोलीस कर्मचारी ताव मारातना दिसत आहे.
एसडीओंवर हल्ल्याचा प्रकार अत्यंत निंदनिय आहे. हल्लेखोर आरोपींचा शोध घेऊन तात्काळ कारवाई करावी या मागणीचे पत्र आपण गृहमंत्र्यांना पाठविले आहे. रेती तस्करांची मोठी हिम्मत वाढत असून आता तर आरोपीला पकडायला गेल्या पोलिसांनी चक्क रेती तस्कारांसोबत पर्टी करीत आहेत. यावर मी शुक्रवारी पत्रकार परिषद घेऊन सर्व महिती देतो, असे आमदार नरेंद्र भोंडकर यांनी सांगितले.