इंद्रपाल कटकवार
भंडारा : दोन महिन्यांपूर्वी भंडारा उपविभागातील पोलीस पाटील पदभरतीत झालेल्या अनियमिततेच्या अनुषंगाने आता नव्याने पोलीस पाटील पद भरतीची प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. आधी झालेली संपूर्ण प्रक्रिया रद्द करण्यात आली असून नियुक्त करण्यात आलेल्या ४९ पोलीस पाटलांना कार्यमुक्तीचे आदेश देण्यात आले आहेत.
भंडारा उपविभागातील भंडारा व पवनी तालुक्यात ४९ जागांसाठी पोलीस पाटील पदभरती प्रक्रिया राबविण्यात आली होती. या भरतीत अनियमितता झाल्याचा ठपका दिलेल्या तक्रारीतून करण्यात आला होता. यात जिल्हाधिकाऱ्यांच्या सक्षम नेतृत्वात झालेल्या प्राथमिक व गोपनीय तपासणीत तत्कालीन उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र राठोड, भंडाराचे तहसीलदार अरविंद हिंगे तथा पवनीच्या तत्कालीन तहसीलदार निलिमा रंगारी यांना तडकाफडकी निलंबित करण्यात आले होते. तसेच त्यांची विभागीय चौकशीचेही आदेश देण्यात आले होते.
त्यानंतर तक्रारकर्त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत संपूर्ण प्रक्रियाच नव्या दमानं पुन्हा घेण्यात यावी, अशी मागणी धरली होती. तसेच सबंधित अधिकारी यांची सखोल चौकशी करीत गुन्हा दाखल करावा, अशी मागणी केली होती. त्या अनुषंगाने शासनाच्या नवीन आदेशानुसार पोलीस पाटील पद भरतीची प्रक्रिया नव्याने राबविण्यात येणार आहे. या आशयाचा दुजोराही उपविभागीय अधिकारी गजेंद्र बालपांडे यांनी दिला. आता ही पदभरती प्रक्रीया केव्हापासून सुरू होणार याकडे आता उमेदवारांच्या नजरा लागल्या आहेत.
भंडारा उपविभागातील पोलीस पाटील भरती प्रक्रिया पुन्हा राबविण्यात येणार आहे. या आश्रयाचे आदेश राज्य शासनाकडून प्राप्त झाले आहेत. तसेच नियुक्त ४९ पोलीस पाटलांना कायमस्वरूपी कार्यमुक्त करण्यात येत असल्याची आदेश देण्यात आले आहेत.
- गजेंद्र बालपांडे, उपविभागीय अधिकारी, भंडारा
भंडारा उपविभागात झालेली पोलीस पाटील भरती प्रक्रिया दोषपूर्ण असल्यामुळेच आंदोलनात्मक पाऊल उचलावे लागले. आमच्या लढायला यश आले. आता भरती प्रक्रिया नव्याने होणार असल्याने या सुधारित आदेशाचे आम्ही स्वागत करतो. पुढील प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने होईल अशी अपेक्षा आहे.
- परमानंद मेश्राम, सामाजिक कार्यकर्ता, भंडारा