२००० पूर्वी गोंदिया जिल्हा हा भंडारा जिल्ह्याचाच भाग होता. सीमेलगतच्या गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्यांसह लगतचे राज्य मध्य प्रदेशातील बालाघाट जिल्ह्यातील व छत्तीसगढमधील राजनांदगाव जिल्ह्यातून नक्षलवादी गोंदिया, आमगाव, सालेकसा, देवरी व अर्जुनी मोरगावसह अन्य जंगलव्याप्त परिसरात आश्रय घेत असल्याची माहिती आहे. १९९९ मध्ये भंडारा जिल्ह्याचे विभाजन होऊन गोंदिया या नवीन जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली. यातील सर्व नक्षलग्रस्त भाग लगतच्या गोंदिया जिल्ह्यात गेला. मात्र, या परिसरालगत साकोली उपविभागातील लाखनी, साकोली व लाखांदूर तालुक्यातील काही भागांत नक्षली कारवाया दिसून आल्या होत्या.
साकोली विधानसभा क्षेत्रातील तत्कालीन आमदार सेवक वाघाये यांनी या विषयावर शासनाला माहिती दीली होती. त्यानुसार साकोली उपविभाग तथा साकोली मतदारसंघातील लाखनी, साकोली व लाखांदूर तालुक्याला नक्षलग्रस्त घोषित करण्यात आले होते. त्यानुसार २००२ पासून साकोली महसूल प्रशासनाअंतर्गत कर्तव्य बजाविणाऱ्या सर्वच विभागांतील अधिकारी, कर्मचाऱ्यांना १५ टक्के नक्षल भत्ता, तर कर्मचाऱ्यांना १२ वर्षांपेक्षा कमी नोकरी असल्याने एकस्तर वेतन श्रेणी व घरभाड्यासह अन्य लाभ शासनाद्वारे दिले जातात.
नक्षली कारवायांवर नियंत्रण ठेवण्याचे काम पोलीस विभागाचे असल्याने या विभागातील पोलीस ठाण्यात अधिकारी, कर्मचाऱ्यांसह पोलीस ठाण्यांची संख्या वाढविण्यात आली. त्यांना आधुनिक शस्त्रांनी सज्ज करण्यात आले. याव्यतिरिक्त परिसरात शांतता व सुव्यवस्था निर्माण करणे, अवैध व्यवसायाला आळा घालणे, गुन्ह्यांवर ताबा ठेवणे, पोलीस हद्दीत होणाऱ्या गुन्ह्यांचा तपास करणे, महत्त्वपूर्ण व्यक्तीला सुरक्षा प्रदान करणे यासह अन्य कामांची जबाबदारी असल्याने त्यांना २४ तास कार्यरत राहण्याची वेळ आली आहे.
साकोली उपविभागातील लाखनी, साकोली व लाखांदूर तालुक्यातील सर्वच विभागांतील अधिकारी, कर्मचाऱ्यांना नक्षलग्रस्त भत्ता दिला जात होता. मात्र, २०१६ पासून पोलीस विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांचा नक्षल भत्ता बंद करण्यात आल्याने पोलीस अधिकारी, कर्मचारीच नक्षल भत्त्यापासून वंचित असल्याचे वास्तव आहे. संबंधित नक्षल भत्ता मिळण्यासाठी पोलीस विभागातील वरिष्ठांनी अनेकदा पत्रव्यवहार केले असून त्याचा कुठलाही परिणाम न झाल्याने पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांत नाराजीचे वातावरण आहे.
बॉक्स
राशन भत्त्यातही कपात व विशेष भत्ता बंद
पोलीस ठाण्याच्या हद्दीत शांतता व सुव्यवस्था राखण्यासह नक्षलग्रस्त कारवाया रोखण्यासाठी सदैव तत्पर असणाऱ्या असणाऱ्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना दरमहा १३५० रुपये राशन भत्ता व ७०० रुपये विशेष भत्ता देण्याची तरतूद आहे. मात्र, संबंधित अधिकारी, कर्मचाऱ्यांना ३० रुपये दिवसाला याप्रमाणे सुट्टी वगळता कार्यरत दिवसांचे जवळपास ७५० रुपये राशन भत्ता दिला जातो, तर विशेष भत्ता गत कित्येक दिवसांपासून बंद असल्याचे नाव न सांगण्याच्या अटीवर कार्यरत एका पोलीस कर्मचाऱ्याने सांगितले.