लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : जिल्ह्यात ठाणेदारांचे खांदेपालट होताच नवीन ठाणेदारांनी अवैध व्यवसायाविरुद्ध मोहीम उघडली असून शुक्रवारी कारधा पोलिसांनी आमगाव नाल्यावर तर सिहोरा पोलिसांनी चुलरडोह येथे रनिंग हातभट्टीवर धाड मारली. मुद्देमालासह दारुविक्रेत्यांना अटक करण्यात आली.भंडारा तालुक्यातील आमगाव नाल्यावर हातभट्टीची दारु गाळली जात असल्याची माहिती कारधा पोलिसांना मिळाली. त्यावरुन ठाणेदार दीपक वानखेडे यांनी धाड टाकली. त्याठिकाणी मातीच्या चुलीवर लोखंडी ड्रममध्ये दारु गाळली जात असल्याचे दिसून आले. याठिकाणी पोलिसांनी सचिन माधोराव उके (२६) रा.आमगाव टोली याला अटक केली. तेथे मोहामाच व दारु गाळण्याचे साहित्य असे ४५ हजार ३५० रुपयांचे साहित्य जप्त करण्यात आले. दुसरी कारवाई सिहोरा पोलिसांनी तुमसर तालुक्यातील चुलरडोह येथे केली. या ठिकाणी अवैध दारु आणि मोहामाच जप्त करण्यात आला. मनोज ईश्वर मडावी (४५) रा.चुलरडोह याला ताब्यात घेण्यात आले. सिहोराचे ठाणेदार पवार यांनी आपल्या पथकासोबत ही कारवाई केली. जिल्हा पोलीस अधीक्षक वसंत जाधव यांनी दिलेल्या सुचनेनुसार जिल्ह्यात अवैध व्यवसायाविरुद्ध मोहीम सुरु करण्यात आली आहे.
लाखांदूर व मासळ येथे कारवाई लाखांदूर पोलिसांनी टाकलेल्या दोन धाडीत अवैध देशी दारु विक्रेत्यासह सट्टापट्टी व्यवसायीकाला अटक केली. नरेश पांडुरंग हरणे रा.मासळ आणि अजय यादवराव गुरनुले (४०) रा.लाखांदूर अशी आरोपींची नावे आहेत. नरेश हा मासळ येथे देशी दारुची अवैध विक्री करताना आढळून आला. त्याच्याजवळून १० नग देशी दारु पव्वे जप्त करण्यात आले तर अजय गुरनुले हा लाखांदुर येथे सट्टापट्टी घेत असल्याचे दिसून आले. त्याच्याजवळून रोख ५३२ रुपये जप्त करण्यात आले. कारवाई ठाणेदार मोहन कोरेटी यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक अमोल कोकाटे. पोलीस नाईक राजेश शेंडे यांनी केली.