भंडारा: नागपूर पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत येथील लालबहादूर शास्त्री विद्यालयाच्या मतदान केंद्रावर जय ओबीसी लिहलेली टोपी आणि गळ्यात दुपट्टा घालून मतदान केंद्रात मतदानासाठी जाणाऱ्या एका मतदाराला भाजपा कार्यकर्त्यांनी अडवून धरले. आचारसंहितेचा भंग होत असल्याचे सांगून टोपी घालून आत जाऊ देऊ नये अशी मागणी माजी सिनेट सदस्य महेंद्र निंबार्ते यांनी यावेळी केली. यावरुन पोलिसांनी त्या मतदाराला स्थानबध्द केले.
यावेळी मतदान केंद्राच्या प्रवेशद्वारावर चांगलाच वाद झाला. अखेर पोलिसांनी येऊन हस्तक्षेप करीत त्या मतदाराला ताब्यात घेतले. वृत्त लिहिस्तोवर त्यांचे मतदान झालेले नव्हते.
भंडाराचे ठाणेदार सुधाकर चव्हाण यांना विचाले असता त्यांनी या प्रकाराला दुजोरा देत त्या मतदाराला पोलीस ठाण्यात स्थानबध्द केल्याचे सांगितले. तर तक्रारकर्ते महेंद्र निंबार्ते यांना विचारना केली असता, हा प्रकार म्हणजे सरळसरळ आचारसंहिता भंगाचा होय. त्यामुळे त्यांना रोखले. पोलीस व मतदान केंद्र अधिकाऱ्यांपुढेच हा प्रकार घडल्याने आपण तक्रार दिली नसल्याचे सांगितले.