निवडणूक शिक्षक मतदारसंघाची : भंडारा जिल्ह्यात १२ मतदान केंद्र भंडारा : नागपूर शिक्षक मतदार संघाची निवडणुकीसाठी १६ उमेदवार रिंगणात असून प्रमुख पाच उमेदवारांमध्ये चुरशीची लढत होत आहे. नागपूर शिक्षक मतदार संघाची निवडणुकीसाठी शुक्रवारला सकाळी ८ ते दुपारी ४ या वेळेत मतदान होणार आहे. या निवडणुकीत भंडारा जिल्ह्यात १२ मतदान केंद्र असून ३,७२१ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत.या निवडणुकीत अनिल शिंदे, ना.गो.गाणार, प्रकाश जाधव, राजेंद्र झाडे, आनंदराव कारेमोरे हे प्रमुख उमेदवार रिंगणात आहेत. या निवडणुकीसाठी भंडारा जिल्ह्यात ३,७२१ मतदार असून त्यासाठी १२ मतदान केंद्र स्थापन केले आहे. भंडारा जिल्ह्यात नाकाडोंगरी केंद्रावर ७५, तुमसर केंद्रावर ५५४, मोहाडी केंद्रावर १८९, भंडारा केंद्रावर १०७१, सावरी जवाहरनगर केंद्रावर ७३, धारगाव केंद्रावर ३८, साकोली केंद्रावर ४७४, लाखनी केंद्रावर ४४०, पालांदूर केंद्रावर १०७, अड्याळ केंद्रावर १६०, पवनी केंद्रावर २५७, लाखांदूर केंद्रावर २६१ असे १२ मतदान केंद्रांवर ३,७२१ मतदार असून यामध्ये २,८४२ पुरूष तर ८७९ महिला मतदारांचा समावेश आहे. या निवडणुकीची मतमोजणी सोमवार, ६ फेब्रुवारी रोजी सेंट ऊसुर्ला हायस्कूल नागपूर येथे होणार आहे. मतदानासाठी निवडणूक आयोगाच्या मतदार ओळखपत्रा व्यतिरिक्त अन्य छायाचित्र असलेले ओळखपत्र ग्राह्य धरण्यात येणार आहे. यामध्ये पासपोर्ट, वाहन परवाना, पॅन कार्ड, पदवी, पदविका प्रमाणपत्र, शासकीय, निमशासकीय उपक्रमाचे सेवा ओळखपत्र, छायाचित्र असलेले बँक पासबूक, छायाचित्रासह असलेले नोंदणीकृत दस्तावेज, छायाचित्र असलेली शिधापत्रिका, जातीचे प्रमाणपत्र, शस्त्र परवाना, अपंगाचे प्रमाणपत्र, आधारकार्ड, एनपीआर अंतर्गत ओळखपत्र दाखवून मतदानाचा हक्क बजावता येईल.मतदानासाठी विशेष नैमित्तिक रजाशिक्षक मतदार संघातील मतदार असलेल्या कर्मचाऱ्यांना मतदानाच्या दिवशी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी त्यादिवसाची विशेष नैमित्तिक रजा मंजूर करण्यात आली आहे. ही रजा कर्मचाऱ्यांना अनुज्ञेय असलेल्या नैमित्तिक रजेव्यतिरिक्त आहे. शिक्षक मतदार संघासाठी निवडणूक आयोगाने उजव्या हाताच्या मधल्या बोटाला शाई लावण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार मतदानाचा हक्क बजावताना मधल्या बोटाला शाई लावण्यात येईल. मतदारांना मतदानाचा हक्क बजावताना मतपत्रिकेवरील पसंतीक्रम दर्शविण्यासाठी ‘विशेष पेन’चा वापर करावयाचा आहे. मतदानासाठी मतदान अधिकारी हा पेन उपलब्ध करून देणार आहे. याव्यतिरिक्त अन्य पेनचा वापर केल्यास मतदान अवैध ठरविण्यात येईल. यासाठी मतदारांनी मतदान केंद्रांवर पुरविण्यात येणाऱ्या पेनचा वापर करावा, असे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी अनूपकुमार यांनी केले आहे. (जिल्हा प्रतिनिधी)
३,७२१ मतदार बजावणार मतदान
By admin | Published: February 03, 2017 12:35 AM