मेंढा रोडवर समता नगर फेज २ ही वसाहत आहे. याठिकाणी संबंधित लेआऊट मालक प्रभात गुप्ता यांनी बगीच्याची निर्मिती केली होती. येथे पूर्वी लहान मुलांना खेळण्यासाठी विविध प्रकारची साधने होती. दररोज सकाळी व संध्याकाळी या वसाहतीसह परिसरातील नागरिक येथे व्यायामासह फेरफटका मारायला येतात. परंतु सध्याच्या परिस्थितीत या बगीच्याची अवस्था दयनीय झाली आहे. परिसरात रानगवत व खुरटी काटेरी झाडे वाढल्याने यात विषारी जिवांचा वावर असल्याने कोणतीही अनुचित घटना घडू शकते.
प्रौढांकरिता बसण्याच्या खुर्च्यांची मोडतोड झाली असून, बसायचं कुठे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. खेळण्याची साधने गंजली असून, मोडतोड झाली आहे. लहान मुलांना खेळण्याचा मोह आवरेना. तरीही मोडकळीस आलेल्या खेळण्याच्या साधनांवर हौस भागवली जाते. त्यामुळे आता चिमुकल्यांना आपण खेळायचे काय? असा प्रश्न पडला आहे. या प्रभागातील नगरसेवकांना याकडे लक्ष द्यायला वेळ नाही. वसाहतीमधील नागरिकांनी बगीच्यांचे सौंदर्यीकरण करून ग्रिनजीम लावण्यात यावे, अशी मौखिक मागणी केली होती. परंतु याकडे दुर्लक्ष केले जात आहे. गेल्या चार वर्षांच्या काळात नगरसेवकांनी कोणतीही ठोस कामे केली नाहीत.