लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : गरजू लाभार्थ्यांना धान्य मिळावे आणि रेशन अन्नधान्य वितरण योग्य पद्धतीने होण्यासाठी रेशनिंग व्यवस्थेचे संपूर्ण संगणकीकरण करण्यात येत आहे. जिल्ह्यातील स्वस्त धान्य दुकानामध्ये आॅनलाईन पद्धतीने धान्य वितरीत करण्यासाठी ८८७ स्वस्त धान्य दुकानामध्ये पॉस (पीओएस - पॉइंट आॅफ सेल) मिशन बसविण्यात आली आहे.धान्य खरेदी करणाºया ग्राहकांचे बायोमेट्रिक खात्री करूनच त्याला धान्य वितरीत करण्यात येणार आहे. यामुळे धान्य वितरणातील गैरप्रकारांना आळा बसणार आहे.भंडारा जिल्ह्यातील भंडारा १७६, तुमसर १६०, लाखांदूर ९७, लाखनी १०८, साकोली १०४, पवनी १३३ व मोहाडी १०९ अशा एकुण ८८७ पॉस मशीन स्वस्त धान्य दुकानात लावण्यात आल्या आहेत. भंडारा जिल्ह्यात एप्रिल २०१७ पासून स्वस्त धान्य दुकानात पॉस मशीनद्वारे धान्य वितरीत करण्यात येत आहे. मागील महिन्यातएक लाख ५२ हजार ६७० शिधापत्रिका धारकांना पॉस मशीनद्वारे धान्य वितरीत करण्यात आले आहे. पॉस मशीनच्या वापरामुळे धान्य वितरणात पारदर्शकता व सुसुत्रता निर्माण झाली आहे.लाभार्थी धान्य घेण्यासाठी रास्त भाव दुकानात आल्यानंतर त्याला अंगठा मशीनवर ठेवून खात्री करावी लागेल. त्यानंतर लाभार्थीचा त्वरीत संपूर्ण डाटा दिसून येईल. त्याला द्यायचे धान्य, त्याची रक्कम याबाबतच्या संपूर्ण तपशीलाची पावतीच मशीनमधूनच बाहेर पडेल. त्या पावतीच्या आधारे रास्त भाव धान्य दुकानदार धान्य देईल. अशा पद्धतीने ई-पीडीएस व्यवहार होत असल्याने वितरण व्यवस्थेत पारदर्शकता वाढण्यास मदत मिळत आहे.अनुदानातून बाहेर पडा योजनाशिधापत्रिकेवरील धान्य लाभार्थी घेत नाहीत तेच धान्य गरजू लोकांना मिळावे, यासाठी गिव्ह इट अप ही योजना सुरु केली आहे. त्याला अनुदानातून बाहेर पडा असे नाव देण्यात आले आहे. ज्यांना रेशनचे धान्य नको आहे त्यांना आपले धान्य स्वेच्छेने नाकारण्याचा पर्याय या योजनेत दिला आहे. त्यातून बचत होणारे धान्य गरजूंना देण्यात येणार आहे.अन्नधान्य वितरण योग्य पद्धतीने व्हावे व गरजूंनाच ते मिळावे यासाठी शासनानी पॉस मशीनद्वारे धान्य वितरण व्यवस्था एप्रिल पासून सुरु केली आहे. जिल्ह्यातील सर्व स्वस्त धान्य दुकानदारांनी या व्यवस्थेला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. पॉस मशीनद्वारे धान्य वितरण प्रणाली लागू केल्यापासून जिल्ह्यात धान्य वितरण संदर्भातील तक्रारी मोठ्या प्रमाणात कमी झाले आहे.-रमेश बेंडे, जिल्हा पुरवठा अधिकारी, भंडारा.
धान्य दुकानात पॉस मशीन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 08, 2017 11:25 PM
गरजू लाभार्थ्यांना धान्य मिळावे आणि रेशन अन्नधान्य वितरण योग्य पद्धतीने होण्यासाठी रेशनिंग व्यवस्थेचे संपूर्ण संगणकीकरण करण्यात येत आहे.
ठळक मुद्देगैरप्रकारावर बसणार आळा : बायोमेट्रिकनंतरच धान्य वितरण