भंडारा : तलावांचा जिल्हा म्हणून ओळख असलेल्या भंडारातही पाणीटंचाईची समस्या वर्षानुवर्षे कायम आहे. मुबलक पाणी असतानाही योग्य नियोजन केले जात नसल्याने उन्हाळ्याची चाहूल लागताच पाणीटंचाईचे चटके जाणवायला लागतात.
यंदा मार्च महिन्यापासूनच पाणीटंचाईच्या झळा बसू लागल्या असून जिल्ह्यातील १३४ गावातील महिलांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने पाणीटंचाई कृती आराखडा तयार केला असून ५ कोटी ३४ लाख रुपयांच्या विविध उपाययोजना सुचविण्यात आल्या आहेत. बावनथडी, चुलबंद नदीतीरावरील गावांमध्ये पाणीटंचाईची चाहूल लागली आहे तर वैनगंगा नदीतीरावरील नागरिकांना दूषित पाण्यामुळे कायम पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. पावसाळ्यात वाहून जाणाऱ्या पाण्याचे योग्य नियोजन केले तर जलपातळीत वाढ होऊन टंचाई संपुष्टात येऊ शकते.
जिल्ह्यात केवळ चार विहिरींचे अधिग्रहण
भंडारा जिल्ह्यातील केवळ चार गावांत विहिरींचे अधिग्रहण प्रशासनाला करावे लागणार आहेत. त्यात जानेवारी ते मार्च महिन्यात मोहाडी तालुक्यातील एका गावासाठी विहीर अधिग्रहित केली जाईल तर एप्रिल ते जून या कालावधीत तीन गावांमध्ये विहिरींचे अधिग्रहण करण्यात येणार आहे. यासाठी ४ लाख रुपये खर्च अपेक्षित आहे.
१९१ गावांत २१८ विंधन विहिरी तयार करणार
जिल्ह्यातील पाणीटंचाई संपुष्टात आणण्यासाठी १९१ गावांमध्ये २१८ विंधन विहिरी खोदण्याचे नियोजन पाणीटंचाईच्या कृती आराखड्यात करण्यात आले आहे. त्यासाठी २ कोटी ५२ लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. तर २०२ गावांतील ३०९ विंधन विहिरींची दुरुस्ती केली जाईल. त्यासाठी ४६ लाख रुपये खर्च अपेक्षित आहे.
उपाययोजना दिसतात केवळ कागदावरच
दरवर्षी उन्हाळा आला की प्रशासनाच्या वतीने संभाव्य पिण्याच्या पाणीटंचाई निवारणार्थ बृहत आराखडा तयार केला जातो. जानेवारी ते जून या कालावधीसाठी हा आराखडा असतो. या आराखड्यात विविध उपाययोजना केल्या जातात. मात्र दरवर्षी त्याच त्या गावात पाणीटंचाई जाणवायला लागते. त्यामुळे कृती आराखड्यातील उपाययोजना केवळ कागदावरच तर राबविल्या जात नाही ना अशी शंका निर्माण होते. यंदा ६६८ गावात पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता गृहित धरण्यात आली आहे. त्यासाठी ५ कोटी ३४ लाख रुपयांचा आराखडा तयार केला आहे. या आराखड्यातील उपाययोजनांची अंमलबजावणी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
टँकरमुक्त जिल्ह्यात पाण्यासाठी दाहीदिशा
भंडारा हा टँकरमुक्त जिल्हा म्हणून ओळखला जातो. जिल्ह्यात गत दोन दशकात कुठेही टँकरने पाणीपुरवठा करण्याची वेळ आली नाही. मात्र अनेक गावात मे महिन्यात पाणीटंचाई तीव्र होते. या गावात खासगी टँकरद्वारे नागरिकांना पाणी आणावे लागते. विहिरीची पातळी खालावली की दूषित पाण्याचा प्रश्न निर्माण होतो. हातपंपालाही पाणी येत नाही. नळ योजना कुचकामी ठरतात. अशा स्थितीत गावकऱ्यांना पाण्यासाठी दाहीदिशा भटकंती करण्याची वेळ येते. लाखनी आणि साकोली तालुक्यात पाणीटंचाईसाठी अनेक गावे प्रसिद्ध आहेत. लाखांदूर तालुक्यातील काही गावांनाही टंचाईचा फटका बसतो. उपाययोजनाही प्रभावहीन ठरत असल्याचे चित्र असते.