विशाल रणदिवे
अडयाळ : विद्युत उपकेंद्र, अडयाळअंतर्गत एकूण ४२ गावे येतात आणि त्यात फक्त एक वर्ष अधिक थकबाकी असणाऱ्या अडयाळ गावातील सर्व तब्बल १० अंगणवाडीमधील १३ ते २३ फेब्रुवारी २०२१ दरम्यान विद्युत विभागाने विद्युत पुरवठा खंडित केला असल्याची माहिती आहे. गेल्या १३ महिन्यांचे १० अंगणवाड्यांचे एकूण विद्युत बिल ४१,२०० असल्याची माहिती आहे. या सर्व अंगणवाड्यांच्या विद्युत बिलांचा भरणा अडयाळ ग्रामपंचायत नियमितपणे सामान्य फंडातून भरत असली तरी, एकूण १३ महिन्यांचे विद्युत बिल असल्याने जेव्हा विद्युत पुरवठा खंडित करणार होते, तेव्हा सरपंच जयश्री कुंभलकर यांनी मार्चपर्यंत बिल भरणार असल्याचे बोलले होते, अशी माहिती आहे.
अडयाळ येथील दहा अंगणवाड्यांचे वीजबिल गेल्या दोन वर्षांपासून ग्रामपंचायत अडयाळ नियमितपणे भरत होती. महत्त्वाचे म्हणजे याचे बिलसुध्दा ग्रामपंचायत अडयाळ येथे येत असल्याची माहिती आहे. पण एक वर्षाच्यावर ज्यांची विद्युत बिले थकित आहेत, अशांची वीज जोडणी वरिष्ठ कार्यालयाच्या आदेशानुसार कापण्यात आल्याची माहिती यावेळी विद्युत उपकेंद्र, अडयाळ येथील सहायक अभियंता अनुराग गजभिये यांनी दिली आहे.
प्राप्त माहितीनुसार, कोरोना प्रादुर्भाव होऊ नये, यासाठी मागीलवर्षीच्या जुलै २०२० पर्यंत एकत्र येऊन मिटिंग घेणे बंद होते; पण ऑगस्टपासून सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून मिटिंग दर महिन्याला दोनदा अंगणवाडी क्रमांक ८, तर कधी ९ मध्ये घेण्यात येत असल्याची माहिती समोर येत आहे. तसेच सी. बी. ई. उपक्रमसुध्दा राबविण्यात येत आहे. त्यात गरोदर व स्तनदा मातांना तसेच किशोरवयीन मुलींना मार्गदर्शन करणे तसेच महिन्यातून दोनदा सुपोषण व अन्न प्राशन दिनाचे आयोजन करणे, मुलांचे वजन घेणे, आहार वाटप, मुलांचे ग्रेडेशन काढणे तसेच रेकॉर्ड मेंटेनन्स करणे आदी कामे अंगणवाडी सेविका व मदतनीस आजही करताना दिसतात.
अशावेळी जर विद्युत पुरवठा खंडित होत असेल, तर त्यात दोष कुणाचा? एकीकडे विद्युत बिल अवाच्या सव्वा आल्याने आजही अनेकांनी आपले विद्युत बिल भरले नाही, तर दुसरीकडे विद्युत ग्राहकांनी विद्युत बिल भरलेच नाही म्हणून विद्युत विभाग विद्युत पुरवठा खंडित करण्याचा सपाटा लावला आहे.
अंगणवाडीमध्ये आजही लहानसहान बालके येऊन बसत नसली, तरी विविध प्रकारच्यानिमित्ताने त्यांना व मातांना यावे लागते आणि आता तर उन्हाची तीव्रता हळूहळू वाढत चालली आहे. याकरिता संबंधित अधिकारी तथा कर्मचारी व ग्रामपंचायत प्रशासनाने याकडे तात्काळ लक्ष घालण्याची मागणी यावेळी अडयाळ ग्रामवासीयांनी केली आहे.