तुमसर : गोबरवाही पाणीपुरवठा योजनेवर सहा लाखांचे वीज बिल थकीत असल्यामुळे गोबरवाही ग्रामीण विभागीय पाणीपुरवठा योजनेची वीज वितरण कंपनीने सोमवारी वीज खंडित केली. त्यामुळे आठ गावातील सुमारे आठ हजार नागरिकांना दूषित पाणी प्यावे लागणार असून त्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
गोबरवाही ग्रामीण विभागीय पाणी पुरवठा योजनेअंतर्गत आठ गावे येतात. यात गोबरवाही, नाकाडोंगरी, राजापूर, चिखला, सीता सावंगी, सुंदरटोला, गणेशपूर टोली, हेटीटोला या गावांचा समावेश आहे. वीज वितरण कंपनीने सोमवारी सदर पाणीपुरवठा योजनेची वीज खंडित केली या योजनेवर सहा लाखाचे वीज बिल थकीत असल्याची माहिती आहे. ही योजना भंडारा जिल्हा परिषद पाणी पुरवठा योजनेद्वारे सुरू आहे.
आठ गावातील सुमारे आठ हजार नागरिकांना नाइलाजाने विहिरींचे अनेक दिवसाचे साचलेले पाणी प्यावे लागणार आहे. पावसाळ्याच्या दिवसात त्यामुळे आजारांना आमंत्रण मिळेल. त्यामुळे नागरिकात तीव्र असंतोष आहे. जिल्हा परिषद बरखास्त करण्यात आली त्यामुळे लोकप्रतिनिधी येथे हतबल आहेत. सदर समस्येवर आमदार, खासदार, जिल्हाधिकारी व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन ही समस्या तत्काळ सोडवावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे. जल जीवन आहे त्यामुळे नागरिकांना पिण्याचे पाणी पुरवठा करणाऱ्या योजनेची वीज पुरवठा खंडित करण्याचा आदेश तात्काळ रद्द करण्याची गरज आहे.