सरपंचांचा आंदोलनाचा इशारा
तुमसर : खरीप हंगामात वीज वितरण कंपनीने कृषिपंपाचे वीज खंडित करण्याचे सत्र सुरूच आहे त्यामुळे शेतकऱ्यात प्रचंड असंतोष आहे धान उत्पादक तुमसर तालुक्यात मागील पाच दिवसांपासून पाऊस बेपत्ता आहे त्यामुळे धानाची रोवणी खोळंबली आहे. २०२२ पर्यंत वीज बिल भरण्याची मुदत असताना वीज वितरण कंपनी सरसकट शेतकऱ्यांची वीज खंडित करीत आहे. त्यामुळे शहर परिसरातील विविध गावाच्या सरपंच यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.
तुमसर तालुका हा प्रमुख धान उत्पादक तालुका आहे. खरीप हंगामात सुरुवातीला पाऊस बऱ्यापैकी पडला. परंतु मागील चार दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली आहे. त्यामुळे धानाची रोवणी थांबली आहे. ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाच्या सोयी उपलब्ध आहेत त्यांनी धानाची रोवणी सुरू केले होते. परंतु वीज वितरण कंपनीने कृषिपंपाची वीज खंडित करण्याचे सत्र सुरू ठेवले त्यामुळे शिवरा परिसरातील धान रोवण्या खोळंबल्या आहेत.
२०२२ पर्यंत कृषिपंपाच्या वीज बिल भरण्याची मुदत देण्यात आली आहे. तरीसुद्धा वीज वितरण कंपनी सरसकट कृषिपंपाची वीज खंडित करीत आहे त्यामुळे शेतकऱ्यात प्रचंड असंतोष पसरला आहे. वीज वितरण कंपनीने वीज खंडित करण्याचे सत्र बंद न केल्यास सिहोरा परिसरातील परसवाडाचे सरपंच राजू मेटे, मांडवीचे सरपंच सहादेव ढबाले, रेंगेपारचे बंटी नागपुरे, कर्कापुरचे प्रल्हाद आगाशे, वाहनीचे गडी राम बांडेबुचे, पंचायत समिती सदस्य हिरालाल नागपुरे यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.