जांब/लोहारा : जिल्हा परिषदेला राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागाकडून गेल्या काही वर्षांपासून जिल्ह्यातील ग्रामपंचायतीच्या हद्दीत येत असलेल्या गावलाइन फीडर विद्युत खांब जोडणी वीज बिलाचा थकीत भरणा करण्यासंबंधी निधी शासनस्तरावरून उपलब्ध केला गेला नसल्याने तुमसर तालुक्यातील संपूर्ण ९७ ग्रामपंचायतींमधील १६५ गावलाइन जोडणीचा वीज पुरवठा खंडित करण्यासाठी वीज वितरण कंपनीने नोटीस बजावली आहे. लोहारासह अर्ध्या अधिक ग्रामपंचायतीच्या गावातील मुख्य गावलाइनचा वीज पुरवठा खंडित करण्यात आला असल्याचा प्रकार समोर आला आहे. गावात सर्वत्र रात्रीला अंधारमय काळोखात गावकरी फिरत आहेत.
गावातील घर टॅक्स, पाणीकर, आरोग्य कर, स्वच्छता कर आदींच्या माध्यमातून गावातील लोकांना सोय-सुविधा उपलब्ध करीत ग्रामपंचायतीला मिळणाऱ्या उत्पन्नातून आपल्या शासकीय कार्यभार चालविला जातो; परंतु बोटावर मोजण्याइतक्या ग्रामपंचायती वगळता उर्वरित ग्रामपंचायतीची आर्थिक स्थिती नाजूक असल्याने गावातील पाणीपुरवठा योजनेचे बिल असो की कर्मचाऱ्यांचे वेतन आदी ग्रामपंचायतीला मिळणाऱ्या उत्पन्नातून आर्थिक ढोलारा हाकावा लागतो. पूर्वीपासूनच ग्रामीण भागातील ग्रामपंचायतीची आर्थिक स्थिती ढासळलेली असताना आजघडीला कोरोनाच्या सावटात प्रत्येक ग्रामपंचायतची वार्षिक वसुली घटली आहे. त्यामुळे पाणीपुरवठा योजनेचे बिल, कर्मचाऱ्यांचे वेतन, गावातील विविध विकासकामे वेळेवर करता येत नसल्याने निधीअभावी ग्रामपंचायतीच्या विकासात खीळ बसली आहे.
वीज बिल एक लाखाच्या वर असल्याने ग्रामपंचायतीचे वीज बिल भरणा करण्यास आर्थिक सक्षम नाहीत. त्यामुळे तुमसर तालुक्यातील ९७ ग्रामपंचायतीमधील १६५ गावलाइन जोडणीचे कनेक्शन खंडित करण्याची नामुष्की ओढवली आहे.
त्यामुळे आता ऐन पावसाळ्यात रात्रीच्या अंधारमय साम्राज्यात ग्रामीण भागातील नागरिकांना वावरावे लागत आहे. शासनाने जिल्हा परिषदेला तात्काळ निधी उपलब्ध करून देत ग्रामपंचायतीच्या हद्दीत मुख्य गावलाइन जोडणीचा वीज बिल भरणा करावा, अशी मागणी ग्रामपंचायत पदाधिकारी यांनी शासनाला केली आहे.