सतीश चिंधालोरे : विद्यार्थी व शिक्षकांना मार्गदर्शन
तुमसर : गणित व मराठी विषयाच्या स्पर्धा परीक्षेत सरावाची नितांत गरज आहे. सराव हाच यशाचा मूलमंत्र आहे, असे प्रतिपादन जिल्हा परिषद डिजिटल पब्लिक स्कूल खराशीचे तंत्रस्नेही शिक्षक सतीश चिंधालोरे यांनी केले.
ते जनता विद्यालयात आयोजित शिष्यवृत्ती परीक्षेसंदर्भात वर्ग पाचवीच्या विद्यार्थी व शिक्षकांना मार्गदर्शन करताना बोलत होते. गणित व मराठी विषय इयत्ता पाचवीच्या विद्यार्थ्यांना कठीण वाटतात. शिष्यवृत्ती परीक्षेत विद्यार्थी यात गोंधळून जातात. कमी वेळात गणित कसे सोडवायचे व मराठी भाषेचा अभ्यास बिनचूक कसा करावा, कोणत्या भागावर जास्त लक्ष केंद्रित करावे, या संदर्भात सविस्तर मार्गदर्शन तंत्रस्नेही शिक्षक सतीश चिंधालोरे यांनी केले. तीन ते चार विद्यार्थ्यांच्या गटाला प्रत्यक्ष कृती करून सांगितली, विद्यार्थ्यांनी त्यांच्या अध्यापनाला उत्तम प्रतिसाद दिला सुमारे दोन तास चिंधालोरे यांनी प्रत्यक्ष अध्यापन केले व विद्यार्थ्यांची मने जिंकली. यावेळी पालकही उपस्थित होते.
इयत्ता पाचवीच्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती धडे देणाऱ्या शिक्षकांनी आपल्या शंका उपस्थित केल्या. त्यांचे निरसन चिंधालोरे यांनी केले. यावेळी मुख्याध्यापक हेमंत केळवदे, उपमुख्याध्यापक शरद भेलकर पर्यवेक्षक राजकुमार गभने विज्ञान शिक्षक पंकज बोरकर यांनी तंत्रस्नेही शिक्षक सतीश चिंधालोरे यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. याप्रसंगी शाळेतील शिक्षक राखी बिसेन लीना मते, मनीष साठवणे, वासनिक, उके गाढवे, बावणकर, मंड्या इत्यादींसह मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.