मुखरू बागडे
पालांदूर (भंडारा) : अशक्य ते शक्य करण्याची मनाची तयारी असल्यास अपेक्षित ध्येय गाठायला अडचण येत नाही. कितीही अडचणी आल्या तरी जिद्द व चिकाटी असल्यास अपेक्षित ध्येयापर्यंत पोहोचता येते. हे प्रतीक गोवर्धन शेंडे या ग्रामीण विद्यार्थ्याने कृतीतून करून दाखविले आहे. महाराष्ट्र राज्य सेवा परीक्षा २०२१ मध्ये राज्यातून १०० वी रँक मिळविली. त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
प्रतीक शेंडे हा साकोली तालुक्यातील वडद येथील मूळचा आहे. पालांदुरात त्याचा जन्म होऊन प्राथमिक शिक्षणातील पहिला वर्ग पालांदूरातच शिकला. वडील शिक्षकी पेशात असल्याने शिक्षणाचे ठिकाण बदलत गेले. सिंहगड अभियंता (इंजिनिअरिंग) महाविद्यालय पुणे येथे त्याने २०१७ ला बीई मेकॅनिक पदवी घेतली. त्यानंतर एमपीएससीचे पुणे येथे वर्ग लावले.
२०१९ ला परीक्षा देत मुलाखतीपर्यंत पोहोचला. मात्र, एक गुण कमी पडल्याने नियुक्ती होऊ शकली नाही. तो अपयश मनात ठेवून प्रतीक जोमाने कामाला लागला. रात्रीचा दिवस करीत कठीण परिश्रमाच्या भरवशावर २०२१ च्या एमपीएससी परीक्षेत घवघवीत यश संपादन केले. प्रथम श्रेणी अधिकाऱ्याची जागा मिळविण्याकरिता तो पात्र ठरला. याचे श्रेय शिक्षक वर्ग, आई वडील व मित्रांना दिला. कदाचित भंडारा जिल्ह्यात तो प्रथम असावा.
पालांदुरात व्यक्त केला आनंद
प्रतीक शेंडे या होतकरू विद्यार्थ्यांनी ग्रामीण विद्यार्थ्यांना स्वतःच्या मेहनत करून प्रेरणा दिलेली आहे. त्याला प्रशासकीय सेवेत प्रथम श्रेणी अधिकारी म्हणून सेवा करण्याचा मान मिळणार आहे. त्याचे वडील पालांदूर येथील गोविंद विद्यालयात मुख्याध्यापक या पदावर काम करीत आहेत. पालांदुरात त्याच्या यशाची बातमी पोहोचतात आनंद व्यक्त करण्यात आला.