भंडारा शहरात पावसाळ्यामध्ये अनेक भागांमध्ये पाणी शिरून नागरिकांना त्याचा त्रास होत असल्याचे अनुभव आहेत. अशा घटनेनंतर प्रत्येक वेळी नगरपालिका प्रशासनाला लक्ष्य केले जाते. पावसाळ्यातील संभाव्य धोका लक्षात घेता नगरपालिका प्रशासनातील अधिकाऱ्यांशी नगराध्यक्ष सुनील मेंढे यांनी चर्चा केली. लोकांना त्रास होणार नाही, यासाठी काय उपाययोजना कराव्यात यावर मंथन झाल्यानंतर नाले सफाईचे काम प्राधान्याने हाती घेण्याचे निर्देश त्यांनी दिले. त्यानंतर आता प्रशासनाने शहरात मोठे नाले आणि नाल्यांची सफाई सुरू केली आहे. २ जूनपासून या नालेसफाईला सुरुवात झाली आहे. प्रत्येक प्रभागातून पावसाचे पाणी वाहून घेऊन जाणारे मोठे नाले आणि नाल्या साफ करण्यात येत आहेत. नालेसफाईमुळे पावसाचे पडणारे पाणी सहज निघून जाईल आणि पावसामुळे लोकांना पाणी घरात शिरून मनस्ताप होणार नाही यादृष्टीने प्रशासनाकडून प्रयत्न केले जात आहेत.
नगर परिषदेच्या मुख्य अधिकाऱ्यांना नगराध्यक्ष खासदार सुनील मेंढे यांनी कामात कोणताही विलंब केला जाऊ नये, असे निर्देश दिले आहेत.