पोलीस भरतीच्या पायलट प्रोजेक्टला उत्साह!
सुशिक्षित बेरोजगार पोलीस बनण्याच्या प्रयत्नात!
पालांदुर पोलीस स्टेशन अंतर्गत सुशिक्षित तरुण पोलीस भरतीच्या वाटेवर!
पालांदूर : दिवसेंदिवस देशासह महाराष्ट्रात सुशिक्षित तरुणांची फौज बेरोजगार आहे. रोजगारासाठी अर्थात नोकरीकरिता तरुणाई वाटेल ते प्रयत्न करण्याची पराकाष्टा करीत आहेत. देशसेवेची आशा बाळगत पोलीस भरतीची स्वप्न उरी बाळगत पालांदुर पोलीस स्टेशन अंतर्गत सुशिक्षित तरुण पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षणाकरिता मेहनत घेत आहेत. त्यांच्या मेहनतीला पालांदुर पोलीस स्टेशनचे ठाणेदार मनोज सिडाम व सहकारी सर्वोतपरी सहकार्य करीत आहेत.
महाराष्ट्र शासनाने सुमारे बारा हजार पाचशे एवढे जम्बो पोलीस भरती करण्याचे जाहीर केले आहे. या भरतीत आपणही सहभागी होऊन बेरोजगारीवर मात करता येईल. या आशेने झपाटलेले तरुण, तरुणी दिवस-रात्र पालांदुरच्या क्रीडांगणावर शारीरिक, बौद्धिक चाचणी करीत आहेत. गत वर्षभरापासून पोलीस विभागाच्या सौजन्याने पोलीस स्टेशनच्या क्रीडांगणाला नवे रूप देण्यात आले. विद्यार्थ्यांच्या हौसेला सहकार्य करत पोलीस विभागाने त्यांच्या संपूर्ण महत्त्वाकांक्षेला पाठिंबा दर्शवला आहे. अख्ख्या भंडारा जिल्ह्याचा विचार केल्यास सर्वात प्रथम पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षणाची मोहीम पालांदुर पोलीस स्टेशनला आखण्यात आली. यापूर्वीचे ठाणेदार अंबादास सुनगार, दीपक पाटील व आताचे मनोज सिडाम यांनी पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षणाकरिता विद्यार्थ्यांना यथार्थ बौद्धिक व शारीरिक सहकार्य केलेले आहे.
पोलीस अधीक्षक वसंत जाधव यांच्या कल्पनेतून पायलट प्रोजेक्ट अंतर्गत जिल्ह्यातील तरुणांना पोलीस भरतीकरिता प्रोत्साहित करण्याचे नियोजन केले जात आहे. त्या अनुषंगाने पालांदुर पोलीस स्टेशनचे ठाणेदार मनोज सिडाम व त्यांचे सहकारी दर शनिवारी शारीरिक व बौद्धिक चाचण्या घेत आहेत. त्यांच्यात असलेल्या उणिवा हटकून ओळखत त्या कशा दूर करायच्या याबाबत मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आले. या शिबिराला गोबरवाही पोलीस स्टेशनचे ठाणेदार दीपक पाटील यांनी पालांदुरला येत विद्यार्थी वर्गांना मौलिक मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांच्या प्रेमापोटी पाटील यांनी गोबरवाहीवरून पालांदुर गाठत विद्यार्थ्यांच्या प्रेमाला आपुलकीची साथ दिली.
बॉक्स
पालांदुर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या संपूर्ण गावातील सुशिक्षित उत्साही पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षणार्थ्यांना मोफत स्पर्धा परीक्षा पुस्तकांचे वाटप नियोजित केले आहे. प्रत्येक गावच्या ग्रामपंचायतमध्ये व पालांदुर पोलीस स्टेशनमध्ये स्पर्धा पुस्तकांकरिता छोटेखानी ग्रंथालयाची निर्मिती आयोजिली आहे. होतकरू विद्यार्थ्यांना कोणत्याही गोष्टीची अडचण पडता कामा नये, अशी थेट व्यवस्था पालांदुर पोलीस स्टेशनचे ठाणेदार मनोज सिडाम यांनी करण्याचा मानस व्यक्त केला आहे. 'मला पोलीस व्हायचेच आहे', ही मनिषा उरी बाळगून ध्येय गाठायचे ठरविलेल्या विद्यार्थ्यांना निश्चितच पालांदुर पोलीस स्टेशनचे सहकार्य सुनिश्चित केले आहे.